श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त निघालेल्या भव्य नगर कीर्तनात अभूतपूर्व उत्साह!
'बोले सो निहाल'चा जयघोष, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी नांदेड, दिनांक २४ (जिमाका) : 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहीदी समागम सोहळ्यानिमित्त आज नांदेड नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली. 'बोले सो निहाल... सत श्री अकाल'चा गगनभेदी जयघोष, आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे होणारी पुष्पवृष्टी आणि या सोहळ्यात संत, भाविक, लोकप्रतिनिधी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी यांचा ओसंडून वाहणारा उत्साह... अशा पवित्र आणि मंगलमय वातावरणात आज भव्य 'नगर कीर्तन' सोहळा पार पडला. या ऐतिहासिक नगर कीर्तनाला आज (दि. २४) सकाळी ८ वाजता तखत सचखंड श्री हजूर अबचल नगर साहिब जी येथून प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुद्वारामध्ये विधिवत अरदास करण्यात आली. यानंतर गुरुद्वाराच्या गेट क्रमांक १ जवळ श्री गुरु ग्रंथ साहिबजींची पालखी येताच नांदेड पोलीस दलाच्या वतीने (Guard of Honor) विधिवत 'मानवंदना' देण्यात आली. या सोहळ्याचे सर्वात विलोभनीय दृश्य म्हणजे हेलिकॉप्टरने गुरुद्वारावर केलेली पुष्पवृष्टी. भव्य नगर कीर्तन मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघ जी, भाई जोतिनदर सिंघ जी, मुख्य ग्रंथी भाई कश्मीर सिंघ जी, भाई रामसिंघ जी, भाई गुरुमीत सिंघ जी या पंच प्यारे साहिबान यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काढण्यात आले. सुशोभित आणि भव्य रथामध्ये श्री गुरु ग्रंथ साहिबजी विराजमान होते. या पवित्र पालखीमध्ये भाई कश्मीर सिंघ जी यांनी पवित्र सेवा अत्यंत भक्तीभावाने केली. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार अशोक चव्हाण, शहीदी समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक आदींसह लोकप्रतिनिधी यांनी विशेष उपस्थिती लावून गुरुचरणी नतमस्तक होत कीर्तनात सहभाग नोंदवला. तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार (भा.पो.से.) आणि नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकाचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग (से .नि. भाप्रसे), त्यांचे सहकारी जसविंत सिंघ (बॉबी) आणि अधीक्षक हरजितसिंग कडेवाले यांनीही उपस्थित राहून नियोजनात सक्रिय सहभाग घेतला. या नगर कीर्तनात शीख धर्माची परंपरा आणि महाराष्ट्राची लोकधारा यांचा संगम पाहायला मिळाला. मिरवणुकीच्या अग्रभागी शीख तरुणांची थरारक 'गतका' प्रात्यक्षिके लक्ष वेधून घेत होती, तर हजारो शालेय विद्यार्थिनींनी सादर केलेले 'लेझिम' नृत्य आणि ढोल-ताशांचा गजर वातावरणात उत्साह भरत होता. एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी हातात 'मानवता की सच्ची मिसाल' आणि 'हिंद दी चादर' असे फलक घेऊन सामाजिक संदेश दिला. नगर कीर्तन गुरुद्वारा गेट क्रमांक १ वरून गुरुद्वारा चौक, महावीर चौक, वजिराबाद, तिरंगा चौक, रामसेतू, रवी नगर, नागार्जुन स्कूल मार्गे मुख्य कार्यक्रमस्थळी म्हणजेच 'मोदी मैदान' येथे पोहोचले. शालेय विद्यार्थ्यांकडून स्वागत गेट क्रमांक १ ते मोदी मैदान या अंदाजे चार किलोमीटरच्या मार्गावर एक अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हजारो शालेय विद्यार्थ्यांनी रांगा लावून शिस्तीत उभे राहत रथाचे भव्य स्वागत केले आणि गुरु ग्रंथ साहिबजींचे दर्शन घेतले. विद्यार्थ्यांनी केलेली फुलांची उधळण आणि त्यांचा उत्साह पाहून उपस्थित भारावून गेले. या संपूर्ण मार्गावर नांदेडकरांनी आपल्या घरांसमोर सडा-रांगोळी काढून नगर कीर्तनाचे जंगी स्वागत केले.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस