जिल्हाधिका-यांकडून आढावा औद्योगिक प्रकल्पांची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा – जिल्हाधिकारी विकास मीना

यवतमाळ, दि. २० (जिमाका) : जिल्ह्यात औद्योगिक विकासाला गती मिळणे आवश्यक असून, औद्योगिक प्रकल्पांशी संबंधित सर्व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज दिले. जिल्हाधिका-यांनी एमआयडीसी व महावितरण आदी यंत्रणांकडे उद्योगांशी संबंधित विविध प्रकरणांचा सविस्तर आढावा आज महसूलभवनात घेतला. यावेळी त्यांनी औद्योगिक वसाहतीतील रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा तसेच अन्य पायाभूत सुविधांची माहिती घेतली व प्रलंबित कामांची सद्य:स्थिती जाणून घेत वेळेत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. उद्योजकांना भेडसावणाऱ्या अडचणी तत्काळ सोडविण्यास प्राधान्य द्यावे. उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. खंडित वीजपुरवठ्यामुळे उद्योगांवर होणारा परिणाम लक्षात घेता भविष्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी औद्योगिक क्षेत्रातील पोलीस चौकीसंदर्भातही चर्चा करण्यात आली. उद्योगांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सुधारणा तात्काळ करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना देण्यात आल्या. मारेगाव, नेर, पुसद व उमरखेड येथील एमआयडीसी क्षेत्रांतील लघुउद्योगांच्या समस्यांचा नियमित आढावा घेण्यात यावा, तर कळंब येथील प्रलंबित कामे एका महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. या आढावा बैठकीस एमआयडीसी उद्योग संघटनेतील एन. सी. सुराणा, संजय बोधरा, आनंद भुसारी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी राम लंके, महाव्यवस्थापक सुनील गरुड,उपअभियंता नरेंद्र विंचुरकर, कनिष्ठ अभियंता चैताली गुडदे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस