हरभऱ्यावर घाटेअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता एकात्मिक व्यवस्थापनाचा अवलंब करण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हरभऱ्याचे पीक फुलोरा अवस्थेत असून या कालावधीत घाटेअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता अधिक असते. घाटेअळी ही हरभरा पिकावरील प्रमुख कीड असून तिचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होऊ शकते, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी दिली आहे.
घाटेअळीची मादी पतंग पानांवर, कोवळ्या शेंड्यांवर, फुलांवर व घाट्यांवर एकेरी अंडी घालते. अंडी उबून बाहेर पडलेली अळी सुरुवातीला पानावरील हिरवद्रव्य खरडून खाते, त्यामुळे पाने पिवळसर होऊन गळून पडतात. पुढील अवस्थेत अळ्या फुले व घाटे पोखरून आतील दाणे खातात. एक अळी साधारणपणे ३० ते ४० घाट्यांचे नुकसान करते.
घाटेअळीचे परभक्षक बगळे, मैना,राघो निळकंठ, काळी चिमणी इत्यादी पक्षी पिकामधील अळ्या वेचून कीड नियंत्रणात मदत करतात. त्यामुळे अवाजवी कीटकनाशक फवारणी टाळावी, ज्या शेतात मका किंवा ज्वारीचा पक्षी थांबे म्हणून वापर केलेला नाही, त्या ठिकाणी प्रति हेक्टर २० बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे उभारावेत.
तसेच घाटेअळीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. यासाठी हेक्झाल्युर कामगंध सापळे एकरी २ किंवा हेक्टरी ५ लावावेत. सलग तीन दिवस सापळ्यात ८ ते १० पतंग आढळल्यास कीड व्यवस्थापनाचे उपाय योजावेत. शेतकऱ्यांनी नियमित पीक निरीक्षण करून १ ते २ अळ्या प्रति मीटर ओळ किंवा ४० ते ५० टक्के पीक फुलोऱ्यात असताना फवारणी करावी.
पहिली फवारणी (५० टक्के फुलोऱ्यावर) लिंबोळी अर्क ५ टक्के किंवा एच.एन.पी.व्ही. (१.१० पीओवी/मिली) ५०० एल.ई./हेक्टर किंवा डायमिथोएट/डायनॉलफॉस २५ ईसी २० मिली प्रति १० लिटर पाणी.
दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी) – इथिऑन ५० ईसी २५ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम १९.७ एससी ९ मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल १८.५ एससी ३ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ ईसी ६.६ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी केले आहे.
000000
Comments
Post a Comment