क्रीडा संकुलांच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करा – जिल्हाधिकारी विकास मीना
यवतमाळ, दि. २० (जिमाका) : जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे यशस्वीपणे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी विकास मीना होते. बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी, क्रीडा विभागाचे प्रतिनिधी तसेच समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन शासन निर्णय दिनांक 24 सप्टेंबर 2025 अन्वये जिल्हा क्रीडा संकुल समित्यांची पुनर्रचना करण्यात आली असून, त्यानुसार जिल्हा क्रीडा संकुल समितीत झालेल्या बदलांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष तथा पूर्वाश्रमीचे उपाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विकास मीना यांचे स्वागत समितीच्या सदस्य सचिव शिल्पा चाबूकस्वार यांनी रोपटे देऊन केले.
शासन निर्णयानुसार स्थायी सदस्य व आमंत्रित सदस्यांचेही स्वागत करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी महेश पडोळे, तालुका क्रीडा अधिकारी श्रद्धा सावंत व आरती काळे, क्रीडा अधिकारी चैताली लोखंडे व सचिन हरणे, कार्यालयीन लिपिक कल्याणी रत्नपारखी आदी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्हा क्रीडा संकुल समितीची पुनर्रचना करण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील क्रीडा संकुलांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. क्रीडा सुविधांची उपलब्धता, देखभाल-दुरुस्ती तसेच खेळाडूंना मिळणाऱ्या सोयी-सुविधांबाबत सखोल चर्चा झाली.यावेळी प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी क्रीडा संकुलांच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करण्यावर भर दिला. खेळाडूंना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.तसेच नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्रीडा उपक्रम राबविण्याचे सुचविले.
बैठकीत आगामी क्रीडा स्पर्धांचे आयोजन, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच खेळाडूंच्या निवड प्रक्रियेबाबतही चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व संबंधितांनी जबाबदारीने काम करण्याचे आवाहन अध्यक्षांनी केले.
यावेळी वि. अ. शिरभाते सदस्य, कार्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रा. विकास टोने, संघटना सदस्य राजू जॉन आदी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून सदस्य सचिव शिल्पा चाबूकस्वार यांनी सभेची सांगता केली.
0000000
Comments
Post a Comment