महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना : अंमलबजावणीचा आढावा एकही पात्र नागरिक लाभापासून वंचित राहू नये -डॉ.ओमप्रकाश शेटे
यवतमाळ दि.21 (जिमाका): महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत सर्वांसाठी अनेक आजारांवर विनामूल्य उपचार उपलब्ध असून, योजनेची व्यापक अंमलबजावणी करा. एकही पात्र नागरिक लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी आज येथे दिले.
डॉ. शेटे यांच्या अध्यक्षतेत महसूल भवनात आज एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सन 2024 पासून राबविण्यात येत असलेल्या एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, असे स्पष्ट निर्देश डॉ. शेटे यांनी दिले.
यावेळी आयुष्मान भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यात एकूण 24 लक्ष 34 हजार 670 पात्र लाभार्थी असून, त्यापैकी 11 लक्ष 96 हजार 387 लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित लाभार्थ्यांपर्यंत आरोग्य सेवांचा लाभ पोहोचविण्यासाठी योजना मिशन मोडवर राबविण्याच्या सूचना डॉ. शेटे यांनी दिल्या.
बैठकीदरम्यान जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांमधील उपचार प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, लाभार्थ्यांच्या तक्रारी तसेच त्यावरील उपाययोजनांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. योजनेंतर्गत लाभार्थ्यांना पारदर्शक, गुणवत्तापूर्ण व त्वरित आरोग्य सेवा मिळावी, यावर विशेष भर देण्यात आला.
यानंतर आयुष्मान भारत गोल्डन कार्ड वितरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत कार्ड पोहोचविण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
Comments
Post a Comment