श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त श्रमदान · दोन हजारविद्यार्थ्यांचा ऐतिहासिक श्रमदानात सहभाग · नांदेड येथील "हिंद-दी-चादर" कार्यक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन · २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड, दि. १३ : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथील असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मोदी मैदान येथे भव्य धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या कालावधीत मैदानावर गुरुद्वारा प्रतिकृती (दरबार साहिब) असणार असल्याने भाविकांना चप्पल अथवा बूट न वापरता अनवाणी प्रवेश करावा लागणार आहे. त्यामुळे भाविकांना चालताना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत विशेष श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. या श्रमदानात नांदेड जिल्ह्यातील १,५०० विद्यार्थी, ॲकॅडमीचे ५०० विद्यार्थी महापालिकेचे कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. श्रमदानाद्वारे मैदानावरील खडे वेचून परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक, क्षेत्रीय धर्मजागरण समितीचे प्रमुख महेंद्रजी रायचुरा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, तहसीलदार आनंद देऊळगावकर, शिक्षणाधिकारी माधव सलगर, रेडक्रॉसचे हर्षद शहा, मनपा अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पांचगे आदी उपस्थित होते. खालसा हायस्कूल, राजर्षी पब्लिक स्कूल, नागार्जुना हायस्कूल, सचखंड पब्लिक स्कूल यासह पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, विविध एनजीओ, सोल्जर ॲकॅडमी, तोटेवाड फिजिकल ॲकॅडमी, नांदेड फिजिकल व गरुडा फिजिकल ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी या श्रमदानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. या श्रमदानातून गुरुप्रती सेवा, समर्पण व प्रेमाची अनुभूती अनुभवास मिळाली. नांदेड येथे सिख धर्मियांचे एक महत्त्वाचे तख्त असल्याने या शहीदी समागम कार्यक्रमाला अनन्यसाधारण महत्व आहे. या कार्यक्रमात विविध धर्म व समुदायांचे भाविक सहभागी होणार आहेत. तरी सर्वांनी नांदेड येथे होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केले. 000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस