जिल्हाधिकारी विकास मीना यांचा विविध तालुक्यांत दौरा आश्रमशाळा, ‘मधाचे गाव’ पाहणी, आदिवासी विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा * स्थायी रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा - जिल्हाधिकारी विकास मीना

यवतमाळ, दि. ७ (जिमाका) : आदिवासी बांधवांसाठी स्थायी रोजगार व उपजिविकेच्या अनुषंगाने मध आणि इतर विविध उत्पादनांच्या निर्मितीसह बाजारपेठ व विपणनाचे जाळे निर्माण व्हावे. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न करा, असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमाळ, पांढरकवडा व केळापूर तालुक्यांचा दौरा करून विविध आदिवासी विकास व प्रशासकीय उपक्रमांची पाहणी व सविस्तर आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमित रंजन व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आश्रमशाळेत धनुर्विद्या प्रशिक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. मीना यांनी दौऱ्यादरम्यान सर्वप्रथम यवतमाळ तालुक्यातील मौजे चिचघाट येथील आश्रमशाळेला भेट दिली. आश्रमशाळेत धनुर्विद्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अमित रंजन, मुख्याध्यापक संजय शिरभाते उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी शैक्षणिक, निवासी व भौतिक सुविधांची पाहणी करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. धनुर्विद्या क्रीडा प्रकार प्राचीन काळापासून येथील संस्कृतीशी निगडित आहे. स्थानिक प्रशिक्षणाचा उपयोग करून या क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्त केल्यास राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होऊ शकतात, असे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावेळी सांगितले. मोरगावला गोदाम व व्यवसाय प्रशिक्षण केंद्राचे भूमीपूजन मोरगाव (मोरवा) येथे सामूहिक वन हक्क व्यवस्थापन गोदाम व व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमास कन्व्हर्जन्स समितीचे अध्यक्ष तथा प्रकल्प अधिकारी अमित रंजन, तहसीलदार राजेंद्र इंगळे, सरपंच विनोद सुरपाम यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या केंद्रासाठी स्व. श्रीमती प्रमिलाबाई देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ९ हजार ७०० चौरस फुट जागा दान देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक आदिवासी समाजाच्या उपजीविकेला चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. मधाच्या गावाला भेट मौजे अंधारवाडी हे ‘मधाचे गाव’म्हणून विकसित होत असून तेथील मध उत्पादन, साठवणूक व विपणनविषयक सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी घेतला. सुमारे ५ लाख रुपयांचे उत्पन्न निर्माण करणाऱ्या या उपक्रमाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत मधाच्या मूल्यवर्धन व बाजारपेठ विस्तारावर भर देण्याच्या सूचना दिल्या. आदिवासी महोत्सवासाठी जागेची पाहणी सुन्ना येथे आदिवासी महोत्सव घेण्याचे नियोजन आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित जागेची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. महोत्सवाच्या आयोजनासाठी आवश्यक सुविधा, नियोजन व सुरक्षिततेबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश त्यांनी दिले. पांढरकवडा येथे आढावा पांढरकवडा येथे प्रकल्प कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. यावेळी लाभार्थ्यांना वनपट्ट्यांचे वितरण करण्यात आले. पर्यटन विकास, बांधकाम व पायाभूत सुविधांची विविध विकास कामे सुरू आहेत. ही सर्व विकासकामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले. पर्यटन विकास, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी कामे, सीएसआर अंमलबजावणीची सद्य:स्थिती तसेच प्रस्तावित नवीन इमारतींच्या उभारणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ०००

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस