तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे ३५० शालेय विद्यार्थ्यांच्या स्वरात दुमदुमली गुरबानी हिंद दी चादर गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त कार्यक्रम
नांदेड, दि. २३ : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षाचे औचित्य साधून, पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड येथे एका भव्य आणि विशेष कीर्तन समागमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ३५० शालेय विद्यार्थ्यांनी एका सुरात केलेल्या श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 'शब्द गुरबानी'च्या गायनाने उपस्थितीतांना मंत्रमुग्ध केले.
पवित्र तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब, नांदेड बोर्डाद्वारे आयोजित हा कार्यक्रम संपन्न झाला. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे ३५० व्या शहीदी समागम वर्ष निमित्ताने, ३५० विद्यार्थ्यांनी त्यांना ही अनोखी स्वरांजली अर्पण केली.
या कार्यक्रमास तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वाराचे जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंघजी, बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (से. नि.भाप्रसे), हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, जसवंत सिंग बॉबी, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक हरजीत सिंघ जी कडेवाले आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या गुरबानीच्या पवित्र स्वरांनी संपूर्ण तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब परिसर आणि वातावरण भक्तिमय झाले होते. या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी (संगत) मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. शालेय मुलांच्या या शिस्तबद्ध आणि भावपूर्ण सादरीकरणाचे मान्यवरांनी कौतुक करत त्यांना मार्गदर्शन केले.
0000

Comments
Post a Comment