दिवसभरात 10 नव्याने पॉझेटिव्ह तर 13 जणांना डिस्चार्ज



Ø 120 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

यवतमाळ, दि. 8: गत आठवड्याभरापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. बुधवारी दिवसभरात 10 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची जिल्ह्यात भर पडली. तर आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 13 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 

आज (दि.8) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 10 जणांमध्ये यवतमाळ शहरातील तायडे नगर येथील तीन महिला आणि तीन पुरुष असे सहा जण आहे. तसेच नेर तालुक्यातील सिंदखेड येथील एक पुरुष आणि नेर शहरातील मालीपूरा येथील एक पुरुष व दोन महिला पॉझेटिव्ह आल्या आहेत. 

मंगळवारपर्यंत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 86 होती. यापैकी 13 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे हा आकडा 73 वर आला. मात्र आज (दि.8) नव्याने 10 जण पॉझेटिव्ह आल्याने जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 83 झाली आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 130 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 10 पॉझेटिव्ह आणि 120 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 114 जण भरती आहे. 

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 355 वर गेला आहे. यापैकी 259 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात 13 जणांच्या मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 29 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 6389 नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी 5927 प्राप्त तर 462 रिपोर्ट अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 5572 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

 

जिल्हाधिका-यांनी घेतली नेर येथे बैठक : नेर येथील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आढावा घेतला. येथील पॉझेटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील जास्तीत जास्त नागरिकांचा शोध घेऊन त्यांचे नमुने तातडीने पाठवावे. पुढील तीन दिवसात किमान 650 नमुन्यांची तपासणी करण्याचे त्यांनी निर्देश दिले. नमुन्यांची तपासणी त्वरीत करण्यासाठी जिल्हाधिका-यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना तातडीने 1000 ॲन्टीजेन किट उपलब्ध करून दिल्या.

नागरिकांनी कोणतीही भीती मनात न बाळगता लक्षणे असल्यास त्वरीत आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. तसेच या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे कोटेकारपणे पालन करावे. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. बाहेर जातांना मास्कचा वापर करावा. अनावश्यक गर्दी टाळावी. हात स्वच्छ धुवावे. सॅनिटायझरचा वापर करावा. या विषाणुची मानवी साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, नोडल अधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, प्रभारी तहसीलदार राजेंद्र चिंतकुंटलवार, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, मुख्याधिकारी नीलेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी रविंद्र दुर्गे यांच्यासह महसूल व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी