कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य नियोजन करा




Ø विभागीय आयुक्तांच्या प्रशासनाला सुचना

यवतमाळ, दि. 10 : पूर्वी कोरोनामुक्त झालेल्या यवतमाळ शहरात पुन्हा पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. ही चिंतेची बाब आहे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशा सुचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिल्या.

नियोजन सभागृहात वाढत्या प्रादुर्भावासंर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते.

पावसाळ्यात रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजन करणे गरजेचे आहे, असे सांगून विभागीय आयुक्त म्हणाले, यवतमाळ शहरात व काही तालुक्यात सातत्याने वाढ होत आहे. व्हीआरडीएल लॅब सुरू झाल्यापासून रोज किती नमुन्यांची तपासणी करण्यात अशी विचारणा केली असता रोज जवळपास 250 ते 300 नमुन्यांची तपासणी येथील प्रयोगशाळेत होत असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात मुबलक औषधीसाठा आहे का, हाय रिस्क आणि लो रिस्क तसेच पूर्वीपासून विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या नागरिकांच्या तपासणीचे नियोजन काय, सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह प्रतिबंधित क्षेत्र किती. वैद्यकीय महाविद्यालयात भरती असलेल्यांपैकी किती जण गंभीरावस्थेत आहे, आदी बाबींची माहिती जाणून घेतली.

तसेच विभागीय आयुक्तांनी यावेळी मनरेगा, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजना, सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत धान्य वाटप आदींचा आढावा घेतला. जिल्ह्यातील 50887 शेतक-यांच्या खात्यात 376.59 कोटींची कर्जमुक्तीची रक्कम जमा झाली आहे. तर जिल्ह्यातील 1 लक्ष 28 हजार 934 शेतक-यांना 993.82 कोटी रुपयांचे कर्जवाटप झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. यावेळी त्यांनी सोयाबीन उगवण तक्रारी तसेच जिल्ह्यात युरीयाचे आवंटन याबाबतसुध्दा विचारणा केली.

जिल्हाधिकारी सिंह यांनी सादरीकरण केले. बैठकीला वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी. भराडी, सहकारी संस्थचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके, उपजिल्हाधिकारी (नरेगा) संगिता राठोड, जिल्हा मार्केटिंग अधिकारी अर्चना माळवे  आदी उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी