जिल्ह्यात 31 जुलै पर्यंत टाळेबंदीत वाढ


सुधारित मार्गदर्शक सूचना लागू

यवतमाळ, दि. 1 : राज्यात कोरोना विषाणुमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात येऊन शासनामार्फत 30 जूनपर्यंत टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर करण्यात आली होती. मुख्य सचिव यांच्या अधिसुचनेनुसार सदर टाळेबंदीची मुदत आता 31 जुलै 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.  त्यानुसार जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी यवतमाळ जिल्ह्याकरिता सुधारीत मार्गदर्शक सुचना लागू केल्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात खालील बाबी या प्रतिबंधीत राहतील. सर्व शाळा, महविद्यालय, शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था व शिकवणी वर्ग इत्यादी बंद राहतील. तथापी ऑनलाईन आंतरशिक्षणास मुभा राहील. हॉटेल, रेस्टॉरेंट मधून खाद्यपदार्थांची फक्त पार्सल, घरपोच सेवा सुरू राहील.  

सर्व सिनेमा हॉल, शॉपींग मॉल, व्यायमशाळा व जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार आणि सभागृह, असेंब्ली हॉल व इतर तत्सम ठिकाणे बंद राहतील.  सर्व सामाजिक, राजकीय, खेळ,करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतीक, धार्मिक कार्य, इतर मेळावे आणि मोठ्या धार्मिक कार्यक्रमांवर पुर्णपणे बंदी राहील. सर्व धार्मिक स्थळे, पुजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद ठेवण्यात येतील. तसेच धार्मिक कार्यक्रम, धार्मिक परिषदा व धार्मिक मेळावे इत्यादींवर बंदी राहील. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील. तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थाची दुकाने, चहाकॉफी सेंटर, पानठेला बंद राहतील. कपड्याच्या दुकानातील ट्रायल रूम बंद राहतील, तसेच विकलेले कपडे बदलवून देण्याचे धोरण अवलंबू नये.

खालील बाबींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. सर्व सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीने मास्क वापरने बंधनकारक राहील. सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी एकमेकांमध्ये 6 फुटाचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. दुकानाच्या ठिकाणी ग्राहकामध्ये 6 फुटाचे अंतर असणे आवश्यक आहे तसेच दुकानामध्ये 5 पेक्षा जास्त व्यक्ती असणार नाहीत. ह्याची दक्षता दुकान मालकाने घ्यावी. मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र येणे यावर प्रतिबंध करण्यात आले आहे.  लग्न समारंभाच्या कार्यक्रमास वेगळ्या परवानगीची आवश्यकता असणार नाही.  लग्न समारंभ खुले लॉन, विना वातानुकुलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह, घर, व घराच्या परिसरात 50 व्यक्तीच्या मर्यादेत सामाजिक अंतर तसेच कोविड-19 संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करण्याच्या अटीवर सकाळी 7 ते सायंकाळी 5 या कालावधीत पार पाडणे आवश्यक राहील.

अंत्यविधी प्रसंगी 50 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाही व सामाजिक अंतराचे पालन करावे लागेल. राज्य शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक  आणि कामाच्या ठिकाणी कोणत्याही व्यक्तीने थुंकने हा गुन्हा आहे. अशा व्यक्तींवर दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखू इत्यादीच्या वापरास बंदी राहील. शक्य होईल तोवर घरूनच काम करावे. सर्व प्रवेश व बाहेर जाण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग, हॅन्ड वॉश, सॉनिटायझर याची व्यवस्था करण्यात यावी. सर्व कामाच्या ठिकाणी वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. सर्व प्रभारी अधिकारी यांनी कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन होईल, शिफ्टमध्ये व भोजन अवकाशमध्ये पुरेसे अंतर राहील याची दक्षता घेण्यात यावी. शाळा व महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांनी त्यांचे कार्यालय व कर्मचारी यांना फक्त ई-सामग्रीचा विकास, उत्तर पत्रिका तपासणे आणि निकाल जाहीर करणे इत्यादी कामास कार्यालय सुरू ठेवण्यास मुभा देण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक वयोगट असणारे 65 वर्षाचे वरिल जेष्‍ठ नागरिक, अनेक व्याधी असणारे व्यक्ती, गरोदर माता, दहा वर्षाखालील मुले यांना अत्यावश्यक कामाचे व आरोग्याचे अपवाद वगळता घराबाहेर पडता येणार नाही. शासकीय कार्यालय व खाजगी ठीकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांनी आरोग्य सेतूचा वापर करणे बंधनकारक राहील.

मुभा देण्यात आलेल्या बाबी. सकाळी 6 ते 9 व सायंकाळी 6 ते 8 या कालावधीत क्रीडा कॉम्प्लेक्स आणि स्टेडियम आणि इतर सार्वजनिक खुली जागा वैयक्तीक व्यायामाकरीता मोकळी राहील. तथापि सदर ठिकाणी प्रेक्षक आणि सामुहिकरित्या एकत्र येण्यास मुभा राहणार नाही. सर्व शारिरीक व्यायाम व त्यासंबंधीत इतर क्रीया सामाजिक अंतर राखून करता येतील. सर्व सामाजिक आणि खाजगी वाहतूकीस  टु व्हिलर- 1 व्यक्ती, थ्री व्हिलर 1+2 व्यक्ती, फोर व्हिलर - 1+2 व्यक्ती या मर्यादीत आसनक्षमतेसह सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपावेतो मुभा राहील. जिल्ह्यांतर्गत वाहतूकीसाठी वेगळ्या वाहन पासची आवश्यकता असणार नाही. यवतमाळ ‍जिल्ह्यांतर्गत बससेवा सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेनुसार सुरू करण्यास मुभा देण्यात येत आहे. सर्व दुकाने, बाजारपेठ सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु दुकानात गर्दी वाढल्यास किंवा सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून आल्यास बाजारपेठ व दुकाने बंद करण्याबाबतचे आदेश काढण्यात येतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. दुध विक्री सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहील. मेडीकल औषधी दुकाने, दवाखाने, पशुवैद्यकीय चिकित्सालये व औषधी दुकाने, वैद्यकीय आपत्कालीन सेवेची वाहतुक 24X7 सुरु राहतील. शहरी व ग्रामीण उद्योग, शहरी भागातील बांधकामे, शासकीय बांधकामे व मान्सुनपूर्व कामे, कुरिअर पोस्टल सेवा, कृषी विषयक कामे व सेवा जसे ट्रॅक्टर, जेसीबी मशीन, बोअरवेल मशीन इत्यादी सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीत सुरू राहतील. ई-कॉमर्स सेवा जिवनाश्यक व जिवनाश्यक नसलेल्या बाबींसाठी तसेच  खाजगी आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 ह्या वेळेच्या मर्यादेत सुरू राहतील. सर्व शासकीय कार्यालये 100 टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यासह शासकीय कार्यालयीन वेळेनुसार सुरु राहतील. बँक व वित्तीय संस्था त्यांचे कार्यालयीन वेळेनुसार सुरु राहतील. मात्र ग्राहकांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेचे बंधन राहील. हॉटेल, रेस्टॉरंटमधून तयार खाद्यपदार्थ्यांची पार्सल, घरपोच सेवा, गॅरेज, वर्कशॉप इत्यादी,  इनेक्ट्रीशीअन्स, प्लंबर, इत्यादी कामे सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील. एल.पी.जी.गॅस सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत (कार्यालयीन वेळेकरीता) घरपोच सिलेंडर पोहचविणे 24x7 सुरु राहतील. पेट्रोलपंप सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत सुरू राहील मात्र अत्यावश्यक सेवेकरीता पेट्रोलपंप 24x7 सुरु राहतील.

केशकर्तनालय, स्पास, सलुन्स, ब्युटी पार्लरची दुकाने केस कापने, केस रंगविणे, वॉक्सींग, थ्रिडीग इत्यादी सेवेकरिता सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विहित अटी व शर्तीच्या अधीन राहून सुरू राहतील.

यवतमाळ जिल्ह्यात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपावेतो संचारबंदी लागू करण्यात येत आहे. सदर कालावधीत कोणीही विनाकारण बाहेर फिरू नये. मात्र अत्यावश्यक सेवेकरीता नेमण्यात आलेले अधिकारी, कर्मचारी, तसेच वैद्यकीय कारणास्तव रूग्ण व त्याच्यासोबत असलेले नातेवाईक यांना मुभा राहील.

वरील आदेशांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी आदेशीत केले आहे.

केस कर्तनालय, स्पॉ, सलून दुकान सुरु ठेवणे करीता अटी व शर्ती  

केस कर्तनालय, स्पॉ, सलुन्सची दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहील. दिलेल्या वेळेतच दुकान उघडावे व बंद करावे. केस कापने, केस रंगविणे, वॉक्सींग, थ्रिडीग इत्यादीस परवानगी देण्यात येत आहे. त्वचेशी संबंधीत सेवा सुरू ठेवता येणार नाही. ह्या सुचना दुकानात ठळकपणे ग्राहकांना दिसतील अशा ठिकाणी बोर्ड लावावा. दुकानात काम करणाऱ्या कामगारांनी संरक्षणात्मक ग्लोज, ॲप्रॉन व मास्क लावणे बंधनकारक आहे. प्रत्येक सेवेनंतर सर्व कामाची जागा, खुर्ची निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.सर्व कामाच्या परिसरातील क्षेत्र व मजले प्रत्येक दोन तासांनी निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. प्रत्येक ग्राहकांकरीता डिस्पोजेबल टॉवेल, नॅपकीन वापरणे आवश्यक आहे. प्रत्येक सेवेनंतर नॉन डिस्पोजेबल (पुन:वापरयोग्य) उपकरणे स्वच्छ व निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. दुकान उघडल्यानतंर तसेच प्रत्येक ग्राहकाच्या वापरानंतर बैठकव्यवस्थेचे व औजाराचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील. केस कर्तनालय, स्पॉ, सलुन्सची दुकानामध्ये प्रतिक्षेवर जागेची उपलब्धता लक्षात घेता जास्तीत जास्त 4 ग्राहकांना दुकानात थांबविण्याची व्यवस्था करावी. येणाऱ्या प्रत्येक ग्राहकासाठी स्वतंत्र टॉवेल, ब्लेड व वारंवार वापरण्यात येणारे इतर साहित्य स्वतंत्र व संपुर्ण निर्जंतुकीकरण करुन वापरावे. दुकानाच्या आवारामध्ये सामाजिक अंतर पाळावे तसेच नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मास्क, रुमाल नाका तोंडाला झाकुण ठेवील अशा प्रकारचे असणे आवश्यक आहे. तसेच दुकानामध्ये सॅनिटायझर, हॅन्डवॉश, साबण व इतर हात धुण्याचे साहित्य ठेवणे बंधणकारक राहील. ग्राहकांना अपॉइंटमेंट घेऊनच येण्यास कळवावे व ग्राहक विनाकारण दुकानामध्ये वाट पाहत राहणार नाही, याची सलुन्स मालकांनी दक्षता घ्यावी. दुकानदार व कारागिर यांनी न चुकता कायम मास्क वापरावा. वरिल नमूद अटीचे भंग केल्याचे आढळून आल्यास कोणतीही पुर्वसूचना न देता दुकान बंद करण्यात येईल तसेच संबंधीत कायदे व नियमांतर्गत दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल.

०००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी