मानव व बिबट्या सहसंबध समजून घेण्यासाठी वन विभाग व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी संयुक्तपणे अभ्यास करणार - वनमंत्री संजय राठोड



                                                                                 

यवतमाळ, दि. 27 : मानव व बिबट्या सहसंबध अधिक समजून घेण्यासाठी बिबट्याच्या टेलिमेट्रि (दूरमिती ) अभ्यासाला पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाची नुकतीच मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या विषयाचा अभ्यासाचा मार्ग मोकळा झाला असून व पुढील दोन वर्षात याचे निष्कर्ष हाती येतील, असा विश्वास वनमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला.

या प्रकल्प अंतर्गत शहरी भागाच्या आसपास वावर करणा-या पाच बिबट्यांना कॉलर जीपीएस  व जीएसएम लावले जाणार असून त्यानंतर बिबट्याचा दोन वर्ष अभ्यास केला जाणार आहे. हा अभ्यास वन विभाग व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी ऑफ इंडिया हे संयुक्तपणे करणार आहे. हा प्रकल्प 62 लाख रुपयाचा असून त्यातील 40 लाख वन विभाग तर 22 लाख हे वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी इंडिया यांचेकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत .

या अभ्यासातून बिबट्याचा प्रसार, अधिवास व आवास क्षेत्र समजून घेण्यास मदत होणार आहे. मानव आणि बिबट्या यांचे परस्पर संबध कसे निर्माण होतात तसेच बिबट्या हे मानवी जीवन सोबत कसे जुळवून घेतात याचा अभ्यास यात केला जाणार आहे. अभ्यासातील निष्कर्ष आधारे बिबट्या व मानव यातील संघर्ष कसा कमी करता यईल या बाबतही या प्रकल्प अभ्यासातून माहिती व निष्कर्ष आपल्याला मिळणार असल्याची माहिती वनमंत्र्यांनी दिली .

हा अभ्यास संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आजूबाजूचा परिसर या अनुषंगाने होणार असून या प्रकल्पावर वन विभाग मार्फत सुनील लिमये अप्पर प्रधान वनसंरक्षक वन्यजीव व वाईल्ड लाईफ कंझर्वेशन सोसायटी इंडिया मार्फत डॉ. विद्या अत्रेय मार्गदर्शन व कामकाज करणार आहेत. डॉ. विद्या अत्रेय यांनी यापूर्वी मानव व बिबट्या संबध व संघर्ष या बाबत अनेक प्रकारचे संशोधन केले असून त्यांचा ज्ञानाचा फायदा  हा  प्रकल्प पूर्ण करताना नक्की होईल, असा विश्वास संजय राठोड यांनी व्यक्त केला आहे.

बिबट्या हा अनुसूचीत यादी क्रमांक 1 मधील प्राणी असल्याने याबाबत पर्यावरण,वन व हवामान बदल मंत्रालय नवी दिल्लीची परवानगी घेणे अनिवार्य आहे . लगतच्या काळात बिबट्या व मानव यातील संघर्ष घटना यात वाढ होत असून या अभ्यासामुळे या घटना कमी करण्यासाठी मदत होणार आहे. संजय गांधी उद्यान मधील बिबटे तेथील जागेचा वापर कसा करतात तसेच त्यांचे  भ्रमण कसे होते, याबाबत या अभ्यासातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे व हा अभ्यासातून  मानव व बिबट्या संघर्ष कमी करण्यावर उपाययोजना सुचवल्या जाणार आहेत.

००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी