जिल्ह्यात एक हजार कोटीच्या वर पीक कर्जवाटप


Ø पालकमंत्री व जिल्हाधिका-यांच्या नियमित आढाव्याचे फलित

यवतमाळ, दि. 11 : सध्या सर्वत्र कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या हाच चिंतेचा विषय बनला आहे. यवतमाळ जिल्हासुध्दा याला अपवाद नाही. गत चार महिन्यांपासून संपूर्ण प्रशासन कोरोनाच्या उपाययोजनेत दिवसरात्र व्यस्त आहे. मात्र असे असले तरी शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेला पीक कर्जवाटपाचा विषय प्रशासनाने सातत्याने लावून धरला आहे. एवढेच नव्हे तर पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या नियमित 'फॉलोअप' मुळे जिल्ह्याने पीक कर्जवाटपाचा एक हजार कोटीचा टप्पा पार केला आहे.

खरीप हंगाम हा शेतक-यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मानला जातो. जिल्ह्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कृषीवर अवलंबून आहे. या हंगामामध्ये शेतक-यांना वेळेवर पीक कर्ज मिळाले तरच त्याचा वर्षभराचा कौटुंबिक डोलारा चालतो. त्यामुळे शेतकरी पीक कर्ज मिळण्यासाठी धडपडत असतो. हीच बाब लक्षात घेऊन कोरोनाच्या गंभीर संकटात तसेच लॉकडाऊनची परिस्थिती असतांनासुध्दा प्रशासनाने पीक कर्जवाटपाला सर्वोच्च प्राधान्य दिले. यासाठी सर्व बँकर्सच्या प्रतिनिधींची वारंवार बैठक घेणे, दररोज पीक कर्जवाटपाचा आढावा घेणे, कमी कर्जवाटप करणा-या बँकांना गती वाढविण्यासाठी प्रोत्साहित करणे आदी शेतकरी हिताचे निर्णय प्रशासनाने घेतले. यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी प्रशासनाला वारंवार सुचना केल्या.

खरीप हंगाम 2020 - 21 करीता जिल्ह्याला 2182. 52 कोटींचे उद्दिष्ट आहे. हे कर्जवाटप साधारणत: सप्टेंबरपर्यंत सुरू असते. मात्र यावर्षी कर्ज वाटपाला सुरुवात होताच एक महिन्याच्या आत जिल्ह्यात 47 टक्के कर्जवाटप झाले आहे. जिल्ह्यात विविध बँकांच्या एकूण 266 शाखा आहेत. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 94 शाखा, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 45 शाखा, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या 26 शाखा, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या 23 शाखा आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या 19 शाखा तसेच इतर बँकांच्या शाखेचा समावेश आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 2 लक्ष 98 हजार 933 सभासद शेतकरी कर्जवाटपासाठी पात्र आहेत. यापैकी 10 जुलै 2020 पर्यंत 1 लक्ष 30 हजार 360 शेतक-यांना एक हजार चार कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. यात सर्वाधिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 75125 शेतक-यांना 447.39 कोटींचे वाटप (81.63 टक्के), स्टेट बँक ऑफ इंडियाने 32776 शेतक-यांना 322 कोटींचे वाटप (54.07 टक्के), सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 5996 शेतक-यांना 51.30 कोटींचे वाटप केले असून इतरही बँकांचा यात वाटा आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे, बँकामध्ये गर्दी होऊ न देणे आदी सुचनांचे पालन करून बँकांनी ही कामगिरी केली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिका-यांनी बँकांचे कौतुक केले आहे. मात्र उर्वरीत पीक कर्जवाटपसुध्दा बँकांनी त्वरीत करावे, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. गतवर्षी संपूर्ण हंगामात जिल्ह्यात केवळ 61 टक्के खरीप पीक कर्जवाटप झाले होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी