वन विभागात पशु वैद्यकीय अधिका-याची पदे भरण्यासाठी सेवाप्रवेश नियमांना मंजुरी - वनमंत्री संजय राठोड



            यवतमाळ, दि. 16 : वन विभागात व विशेष करून व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची पुरेशी काळजी घेणे व त्यांना वेळेवर योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी सहा पशु वैद्यकीय अधिकारी (गट-अ) यांची नव्याने पदे भरण्यासाठी सेवा प्वेश नियमांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. तसेच यावेळी त्यांनी नागपूर येथील वन्यजीव उपचार केंद्राची पाहणी केली व उत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचा-यांचा गौरव केला.

व्याघ्र प्रकल्प क्षेत्र तसेच लगतच्या इतर क्षेत्रात वन्य प्राण्यांबाबत विविध अपघात व आजारपण अशा घटना घडत असतात. त्यासाठी तातडीने उपचार करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ वनविभाग अंतर्गत उपलब्ध असावे म्हणून सहा पशु वैद्यकीय अधिकारी (गट-अ) ची नव्याने पदे भरण्यासाठी सेवा प्रवेश नियमांना मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत नियमाधीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात होईल, असे वनमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात सहा राष्ट्रीय उद्याने व 49 अभयारण्य आहेत. तसेच राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प असून एकूण 312 एवढे वाघ आहेत. वाघ व इतर वन्यजीवांना आजारपण व अपघाताच्या वेळी प्रशिक्षित पशु वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने या प्राण्यांना जीवास मुकावे लागते. तसेच वन्यप्राणी मृत्यू पावल्याच्या प्रकरणातसुद्धा तातडीने कार्यवाही करण्यास विलंब होत होता. त्यामुळे वन विभागात प्रशिक्षित पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावे, ही मागणी अनेक दिवसांपासून वन्यजीव प्राणी अभ्यासक व वनविभाग क्षेत्रीय अधिका-यांची होती. त्यामुळे सदर निर्णयाला वनमंत्री संजय राठोड यांनी मंजूरी दिली आहे.

या निर्णयाने राज्यात पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होणार असल्याने ही समस्या काही अंशी सुटणार आहेत. राज्यात वन विभाग मार्फत गोरेवाडा येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व माणिकडोह जुन्नर येथे वन्यप्राणी बचाव केंद्र चालवण्यात येते. त्याशिवाय चंद्रपूर, वडाळी , नवेगावबांध, सेमिनरी हिल्स नागपूर येथे तात्पुरते वन्यप्राणी उपचार केंद्र कार्यरत आहे. या निर्णयामुळे या केंद्रांना प्रशिक्षित पशु वैद्यकीय अधिका-यांचे  मार्गदर्शन, सल्ला व मदत उपलब्ध होणार आहे. तसेच सहायक आयुक्त पशुसंवर्धन(वन्यजीव ) व उप आयुक्त पशु संवर्धन (वन्यजीव) या पदांचे सेवाप्रवेश अंतिम करण्याचे काम अंतिम टप्यात असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी