पाच हजार प्रयोगशील शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर - कृषिमंत्री दादाजी भुसे




Ø रिसोर्स बँकेद्वारे शेतक-यांना होणार फायदा

यवतमाळ, दि. 6 : प्रयोगशील शेतकरी नाविन्यपूर्ण प्रयोगाद्वारे विविध उत्पादन घेऊन आर्थिक समृद्धी साधत आहेत. शेतीतंत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा राज्यातील इतर शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी पाच हजार प्रयोगशील शेतकऱ्यांची माहिती संकेतस्थळावर रिसोर्स बँक या नावाने जपणूक करण्यात येत आहे, असे  कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी खैरगाव देशमुख येथे सांगितले.

यवतमाळ जिल्ह्यातील खैरगाव येथील आदिवासी शेतकरी महेंद्र नैताम यांच्या प्रयोगशील शेतीचे पाहणी करतांना ते बोलत होते. यावेळी राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालिंदा पवार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पांढरकवडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी भाग्यश्री विसपुते, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रयोगशील शेतकऱ्यांची माहिती सर्वांना व्हावी व इतरांनादेखील त्यांच्यापासून मार्गदर्शन घेता यावे म्हणून आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या साडेतीन हजार शेतकऱ्यांची माहिती कृषी विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते व वनमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत या संकेतस्थळाचे उद्घाटन करून सिसोर्स बँकेचा शुभारंभ करण्यात आला.

            कृषिमंत्री भुसे पुढे म्हणाले, चिंतामुक्त शेतकरी हे धोरण नजरेसमोर ठेवून पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ या त्रिसुत्रीचा अवलंब करून शेतकऱ्यांची प्रगती साधणे, त्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष संवादाद्वारे बी-बियाणे, खतांबाबत विचारणा करणे, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.         शासनामार्फत वेळेवर धान्य खरेदी या विषयावरील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना कृषी मंत्री म्हणाले, शासकीय धान्य खरेदी हा विषय पणन मंत्रालयाशी संबंधित असल्याने यापुढे त्यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना लाभ होईल यादृष्टीने खरेदीचे नियोजन करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध करून देण्यात येईल. पुढील वर्षी 50 हजार मेट्रीक टन युरियाचा बफर स्टॉक करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

            महात्मा जोतिराव फुले शेतकरी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 30 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहे. त्यापैकी 19 लाख शेतकऱ्यांचे 12 हजार कोटी रुपये थकीत कर्जाची रकम बँकांना वितरीत करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे कर्जमुक्ती योजनेची थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. उर्वरित 11 लाख शेतकरी बांधवांचे थकीत कर्जाचे पैसे व्याजासकट बँकांना देण्यात येत आहेत. तसेच या शेतकऱ्यांना चालू हंगामात पीक कर्ज देण्याचे आदेशही बँकांना देण्यात आल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले.

यावेळी प्रगतीशील शेतकरी महेंद्र नैताम, सतीश भोयर, प्रकाश पुज्जलवार, दिलीप शेंडे, हेमराज राजुरकर, पवन पाटील, कृष्णा देशीटवार यांचा शाल-श्रीफळ देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पुर्वी कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त मोरवा येथील मुरलीधर लखमापूरे यांच्या शेतीचीही मंत्रीद्वयांनी पाहणी केली.

 

            कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, कृषी भूषण शेतकरी श्री. वांजरीकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, पांढरकवडाचे उपविभागीय कृषी अधिकारी जगन राठोड, कृषी विकास अधिकारी राजेंद्र घोंगडे, गटविकास अधिकारी सुरेश चव्हाण, तहसीलदार सुरेश कोहळे, मोहन मामीडवार, जितेंद्र पोंगारेकर, जयंत बंडेवार, काशीनाथ मिलमिले व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

०००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी