*उत्कृष्ट काम करण्याऱ्या 3 जिल्हा परिषद शाळांना प्रशस्तीपत्र प्रदान*

यवतमाळ, दि ३०(जिमका):- जिल्हयातील काही निवडक शाळांचा आदर्श शाळेच्या धर्तीवर विकास करण्यासाठी शाळांना पायाभुत सुविधा, डिजीटल तंत्रज्ञान, शाळा तिथे पोषण परसबाग व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम घेण्यात आले होते. सन २०२१-२२ मध्ये निवडण्यात आलेल्या शाळांपैकी 3 शाळांना २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, सावरगड, तालुका यवतमाळ, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवनाळा, तालुका कळंब व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धनसळ, तालुका पुसद यांचा समावेश आहे. सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन, ग्राम विकास विभागांतर्गत बालभारती अर्थसहाय्यातून सन २०२१-२२ मध्ये मिशन १०० आदर्श शाळा अंतर्गत शाळांमध्ये भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उपक्रम सुरू करण्यात आले होते. त्या शाळांमध्ये शासकीय योजनांचे कृतिसंगम, लोकसहभाग (लोकवाटा व श्रमदान) व सी एस आर निधीतून शाळांनी चांगले काम केले असून, या अभियानास शाळेतील शिक्षक वृंद, विद्यार्थी-पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व गावकऱ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या वतीने आदर्श शाळा विकास कार्यक्रमाची यशस्वीरित्या अंमलबजावणी केली असून, सन २०२२-२३ मध्ये सुध्दा नव्याने जिल्हा परिषद शाळांचा आदर्श शाळेच्या धर्तीवर विकास करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये यवतमाळ जिल्हयातून 5 शाळांची निवड करून त्यांना निधी वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रमोद सूर्यवंशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत पंकज भोयर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. सावरगड शाळेच्या मुख्याध्यापिका आशा नगराळे, देवनाळा शाळेचे केंद्र प्रमुख श्री. नारायण हेडाऊ तसेच धनसळ पुसद च्या वतीने प्रणिता गाढवे, विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग यांनी प्रशस्तीपत्र स्वीकारले. कार्यक्रमाला अर्चना कुऱ्हे, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी