मराठी भाषा पंधरवाडामिमित्त कला महोत्सवाचे आयोजन*

*रेगिस्तान-ए-गझल’ हा गझल कार्यक्रम व अमृता, साहिर, इमरोज या नाटकाचा प्रयोग* यवतमाळ, दि १० जाने, जिमाका: मराठी भाषा पंधरवडा निमित्ताने महसूल कर्मचारी संघटना, यवतमाळ यांच्या वतीने परिवर्तन, जळगाव या संस्थेचा राज्यभर गाजत असलेला ‘कला महोत्सव’ यवतमाळ मध्ये आयोजित करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचत भवन येथे १४ व १५ जानेवारीला कला महोत्सवाचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे. ‘ रेगिस्तान-ए-गझल’ या कार्यक्रमाचे सादरीकरण १४ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे. गज़ल म्हणजे काय, गज़ल कुठून आली, कशी रुजली, अरबस्तानमधली गझल भारतात येऊन भारतीय कशी झाली. आज भारतातील सगळ्यात लोकप्रिय काव्य प्रकार गझल आहे. याच गझलचा शोध एका संगीतमय कार्यक्रमामधून घेण्यात येणार आहे. अमरावती महसूल विभागाचे विभागीय आयुक्त ज्येष्ठ गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या संकल्पनेमधून व निवेदनामधून हा संगीतमय गझल गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. दुसऱ्या दिवशी,१५ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता शंभु पाटील लिखित ‘अमृता, साहिर, इमरोज ह्या नाटकाचा व ‘नली’ या एकल नाट्याचा प्रयोग सादर होणार आहे. अमृता, साहिर, इमरोज हे नाटक सुप्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम यांच्या जीवनावर आधारित नाटक आहे. अमृता, गीतकार साहिर लुधियानवी, चित्रकार इमरोज यांच्या जीवनातील प्रीत काळ नाट्यरूपातून सादर करण्यात येणार आहे. मुंबई ,पुणे व राज्यभरात सध्या चर्चेत असलेले हे नाटक आहे. त्याचं दिवशी 'नली' ह्या एकपात्री नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. कवी श्रीकांत देशमुख यांच्या नलिनी देवराव या व्यक्तिचित्रणाचे शंभु पाटील यांनी नाट्यरूपांतर केले असून, हर्षल पाटील या एकल नाट्याचे सादरीकरण करतील. अहिराणी बोलीतील 'नली’ ह्या एकल नाट्याचे राज्यात व बाहेर ६३ प्रयोग आजवर झाले आहेत. राज्यभर गाजत असलेला हा कला महोत्सव, यवतमाळ मधील रसिकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात येत आहे. शासनाने मराठी भाषेच्या उन्नतिसाठी मराठी भाषा पंधरवडा १४ ते २८ जानेवारी दरम्यान साजरा करण्याचे निर्देश दिले आहे. त्या औचित्यने या कार्यक्रमाचे आयोजन महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. या दोन दिवसीय रंगारंग कार्यक्रमाचा आस्वाद यवतमाळकर रसिकांनी घ्यावा,असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी