अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा- जिल्हाधिकारी राष्ट्रीय मतदार दिन साजरा* मतदार जागृतीसाठी निघाली रॅली*

यवतमाळ, दि २५ जाने, (जिमाका):- विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच देशातील संवैधानिक संस्थांची कार्ये आणि जबाबदाऱ्या याची माहिती करून घेतली पाहिजे. निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त ही संवैधानिक संस्था आणि पद आहे. देशातील निवडणुका पार पाडण्याचे काम निवडणूक आयोगामार्फत होत असते. आपले आणि आपल्या देशाचे भविष्य उज्वल होण्यासाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने मतदान नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा आणि राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात आज 25 जानेवारी मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य राम तत्ववादी, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, तहसीलदार कुणाल झाल्टे उपस्थित होते. पुढे बोलताना श्री येडगे म्हणाले, विद्यार्थ्यांना आता मोबाईल अप्लिकेशन द्वारेच मतदार नोंदणी करता येते. मतदार यादी, मतदार केंद्र, आपल्या कुटुंबातील सर्व मतदारांची माहिती व्ह्वोटर हेल्पलाईन ॲप द्वारे आपल्याला घरबसल्या माहिती करून घेता येते. त्यामुळे १८ वर्षे पुर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी व्होटर हेल्पलाइन ॲपद्वारे मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करून मुक्त, नि:पक्षपाती, शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक मतदाराने निर्भयपणे तसेच धर्म, वंश, समाज, भाषा या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मतदार जागृतीसाठी विविध माहाविद्यालयांनी घेतलेल्या स्पर्धेत पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावकेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या आणि प्रथम, द्वितीय, क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्वात जास्त मतदार नोंदणी करणाऱ्या बूथ लेवल अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात करण्यात आले. यावेळी बोलताना डॉक्टर स्नेहल कनिचे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना,भारत हा तरुणांचा देश आहे आणि भारताचे भविष्य तरुण आहेत. भारताचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी लोकशाही देशात निवडणूक हा महत्त्वाचा भाग आहे आणि निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराने मतदान करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निसंकोचपणे, नि:पक्षपातीपणे मतदान करण्याचे आवाहन केले. प्राचार्य राम तत्ववादी यांनी विद्यार्थ्यांना मतदार दिनाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमासाठी महविद्यालयाची निवड केल्याबाबत आभार मानले. भारत निवडणुक आयोगाने आज मतदारांसाठी मै भारत हुं हम भारत के मतदाता है! एक गीत जारी केले. ते गीत या कार्यक्रमात दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागिय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी केले तर तर आभार तहसीलदार कुणाल झालटे यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते. दरम्यान सकाळी मतदार जागृतीसाठी रॅली काढण्यात आली होती या रॅलीला उपजिल्हाधिकारी निवडणुक यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅली मार्गस्थ केली. सदर रॅली ही आझाद मैदान-पोलीस स्टेशन यवतमाळ-नेताजी चौक-बस-स्टॅन्ड-एल.आय.सी.चौक या मार्गाने मार्गक्रमण करुन बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे रॅलीचा समारोप झाला.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी