सामुहिक व वैयक्तिक वनहक्क मिळालेल्या वनवासींना इतर विभागाच्या योजनांचा लाभ मिळवून द्या जिल्हाधिकारी

यवतमाळ दि 17 जिमाका: वनहक्क कायद्याअंतर्गत सामूहिक व वैयक्तिक वनहक्क मिळालेल्या वनवासींना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी इतर विभागाच्या सामूहिक व वैयक्तिक योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात श्री येडगे यांनी आज अभिसरण समितीची बैठक घेतली. यावेळी आदिवासी लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनांबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. पांढरकवडा आणि पुसद प्रकल्प अधिकाऱ्यांनी आतापर्यंत सामूहिक वन हक्क मंजूर झालेल्या 767 गावांपैकी २५० गावांमध्ये वन व्यवस्थापन समित्या गठीत कराव्यात. या समित्यांकडुन आदर्श व्यवस्थापन आराखडा तयार करावा. 20 फेब्रुवारीच्या आत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. त्याचबरोबर वैयक्तिक आणि सामूहिक वन हक्क दावे सुटलेल्या ग्रामपंचायतीने अशी प्राकरणे पुन्हा सादर करावीत. तेंदुपत्ता संकलन करताना यावर्षी काही अडचणी उद्भवणार नाहीत याची काळजी घेण्यात यावी. 767 सामूहिक वन हक्क मिळालेल्या गावांपैकी किती गावांमध्ये तेंदुपत्ता संकलन केले जाते त्या गावांची यादी तयार करावी. या सर्व गावात मनरेगा अंतर्गत वृक्ष लागवड, शेततळे, तलाव इत्यादी कामे घेण्यात यावी. तसेच पशुसंवर्धन विभागांतर्गत शेळी व दुधाळ जनावरे वाटप योजना राबविण्यात यावी. 909 वैयक्तिक वन हक्क मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्यांना सातबारा, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला,आधार, बँक अकाउंट इत्यादी कागदपत्रे मिळवून द्यावीत. वैयक्तिक योजनांचा लाभ देताना जी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतात ती कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत का याची खात्री करावी, नसल्यास त्यांच्यासाठी एक दिवस शिबिर आयोजित करण्यात यावे. तसेच मनरेगा, पशुसंवर्धन, कृषी विभाग, आदिवासी विकास विभाग आणि विद्युत वितरण यांनी त्यांच्याकडील वैयक्तिक योजनांचा लाभ वैयक्तिक वन हक्क मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना मिळवून द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्यात. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, उपवनसंरक्षक आनंद रेड्डी, उपजिल्हाधिकारी रोहयो संगीता राठोड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले तसेच दूरदृष्य प्रणाली द्वारे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पांढरकवडा याशनी नागराजन, उपविभागीय अधिकारी पांढरकवडा, पुसद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी