निष्काळजीपणामुळे होणारी जीवित हानी टाळा मान्सुन पूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांचे निर्देश मान्सुनपुर्व उपाययोजनेची कामे मे अखेर पूर्ण करा नियंत्रण कक्षाचे कामकाज 24 तास चालू ठेवावे

यवतमाळ, दि. 11 मे (जिमाका) :- मान्सून कालावधीत वीज पडणे, नदी-नाल्यांना पूर येणे, साथीचे आजार, धरणसाठ्यातून पाण्याचा विसर्ग अशा बाबी हातळण्यातील निष्काळजीपणामुळे होणारी जीवित हानी टाळण्यासाठी नागरिकांमध्ये योग्य माहिती देवून जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. मान्सुन पुर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज घेतला. या आढावा बैठकीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा साथरोग अधिकारी तन्वीर शेख, मुख्याधिकारी डोल्हारकर तसेच दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सिंचन मंडळाचे सर्व कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, सर्व नगरपरिषद मुख्याधिकारी, तहसिलदार, कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी येडगे यांनी याप्रसंगी जिल्ह्यातील पूर प्रवण गावांचे ओळख करणे, मुख्य नद्यांच्या प्रवाहामधील अडथळे काढणे, नैसर्गिक जलाशयांचे साफसफाई करणे व त्यातील गाळ काढणे, नदीकाठावरील बंधारे व साठवण तलावाचे बळकटीकरण व डागडूजी आदि कामे मे महिन्यापुर्वी करण्याचे निर्देश दिलेत. जिल्ह्यातील सर्व धरणे १०० टक्‍के सुरक्षीत असल्‍याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या. सर्व प्रमुख धरणावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करणे, धरणातील पाण्याच्या साठ्यावर लक्ष ठेवणे, धरणाच्या आजूबाजूला राहणाऱ्या गावकऱ्यांना धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल सावधगिरीचा इशारा देणे इत्‍यादी बाबत कृती आराखडा तयार ठेवण्यास सांगितले. पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटणा-या अतिसंवेदनशील गावांची यादी करून तेथे आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या. बचाव पथकासाठी उपलब्ध असलेले जेसीबी, क्रेन, गाडी, ट्रक, व्हॅन, मॅन पावर इत्यादी साहित्य सामुग्री अद्यावत करण्‍यात यावी. नगर परिषद क्षेत्रातील नाले सफाई करणे. नियंत्रण कक्षाचे कामकाज 24 तास चालू ठेवणे, आपत्ती पूर्व सूचना देणारे संबंधित संस्थाचे दूरध्वनी ‌क्रमांकाची यादी अद्ययावत करणे व त्याची वेळोवेळी पडताळणी करणे, आपत्ती विषयक पूर्वसूचनांचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. पुलावरून पाणी वाहून जाण्याची शक्यता लक्षात घेता अशा ठिकाणी कोणीही पुराच्या पाण्यात जाणार नाही याबाबत स्थानिक अधिकारी कर्मचारी यांनी नियोजन करावे व संबंधीतांना आवश्यक पूर्वसूचना द्याव्या. तसेच नदी पातळी वाढल्यावर तेथे कोणी पोहायला जाणार नाही, याबाबत नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यास सांगितले. मान्सून कालावधीत विज पडून मोठ्या प्रमाणात जिवित हानी होत असते. हे टाळण्यासाठी भारतीय मौसम विभागाने तयार केलेले ‘दामिनी’ ॲपचा वापर सर्वांनी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. दामिनी ॲप मध्ये जेथे वीज पडणार आहे त्या भागाची स्थलदर्शक माहिती विज पडण्याच्या 15 मिनिटापुर्वी दर्शविण्यात येते. त्यामुळे त्या भागातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांच्या मोबाईलवर पूर्वसुचना देवून खबरदारी घेण्याचा मेसेज करून जीवीत हाणी टाळता येईल. विद्युत पुरवठा, दूरध्वनी, रस्ते व पुल आपत्तीच्या वेळीसुध्दा सुरळीत चालू राहतील याची खबरदारी घ्यावी. अत्यावश्यक वस्तूंचा साठा , पूर परिस्थितीत व पूर परिस्थिती ओसरल्यानंतर लागणारे औषधीद्गव्यांचे पूर्व नियोजन, प्राथमिक आरोग्य केंद्गासाठी लागणार्‍या औषधांचा साठा सुनिश्चित करून, साथ रोगांवर नियंत्रण व उपाययोजनेचा आराखडा तयार ठेवण्यात यावा. जनावरांचे औषधांचा मुबलक साठा तसेच जनावरांसाठी पुरेसा चाऱ्याचा साठा ठेवणे, आपत्कालीन परिस्थितीतही शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होईल यांचेही नियोजन करण्‍याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. बांधकाम सुरू असलेले वाहतुकीचे महत्वाचे मार्ग पावसाळ्यापुर्वी पूर्ण करणे व ते विहित कालावधीत पुर्ण होणे शक्य नसल्यास पर्यायी मार्गाची व्यवस्था देखील पावसाळ्यापुर्वी पुर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांनी बैठकीत पीपीटीद्वारे माहितीचे सादरीकरण केले.बैठकीला आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी