खनिज प्रतिष्ठान निधीचा उपयोग शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी या मुलभुत सुविधांसाठी करावा - पालकमंत्री संजय राठोड

जिल्हा खनिज प्रतिष्ठान नियामक परिषदेची बैठक संपन्न यवतमाळ, दि 15 मे :- जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडील निधीचा उपयोग शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ता, महीला व बालकल्याण, दिव्यांग व्यक्तींचे कल्याण या बाबींसाठी प्राधान्याने करण्यात यावा. त्याचबरोबर बाधित क्षेत्रातील गावांना प्राथम्य देण्यात यावे अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्यात. जिल्हा खनिज प्रतिष्ठान नियामक परिषदेची बैठक पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे झालेल्या या बैठकीला खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, आमदार प्रा. अशोक उइके, आमदार इंद्रनील नाईक, आमदार निलय नाईक, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. शिरीष नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी प्रल्हाद चव्हाण, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा प्रदीप कोल्हे उपस्थित होते. जिल्ह्यात प्रत्यक्ष खाण बाधित आणि अप्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रातील गावांची यादी तयार करण्यात आली आहे. २१४३ बाधित गावांपैकी प्रत्यक्ष खाण बाधित गावांची संख्या ४६० असून अप्रत्यक्ष खाण बाधित गावांची संख्या १६८३ आहे. शासनाच्या निर्देशानुसार प्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्राला उच्च प्राथम्य द्यायचे असून शिक्षण, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्रथम नियोजन करायचे आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठान कडे ४३८ कोटी ७८ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध असून त्यासाठी १९४४ विकास कामांचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. सन २०२३-२४ या वर्षासाठी २६२ कोटी रुपये किमतीचा आराखडा तयार केलेला असून उच्च प्राथम्य बाबींमध्ये ६० टक्के म्हणजे १७४ कोटी ६६ लक्ष रुपयांचा (यात प्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रासाठी १०४ कोटी ८० लक्ष तर अप्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रात ६९ कोटी ८६ लक्ष रुपये) तसेच अन्य प्राथम्य बाबीसाठी ४० टक्के म्गणजे ८७ कोटी ३३ लक्ष (यात प्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रासाठी ५२ कोटी ४० लक्ष तर अप्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रात ३४ कोटी ९३ लक्ष रुपये) रक्कम विकासकामांकरिता उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले कि, अनेक चांगल्या व मोठी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा जिल्ह्यात आहेत, मात्र तिथे शिक्षकांची कमतरता असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. या जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून अशा ३० टक्के आदर्श शाळा निवडून तेथे शिक्षकांची सेवा मानधन तत्वावर घेण्यात यावी. त्याचबरोबर हे शिक्षक गावातील होतकरू उच्चशिक्षित तरुण असतील यावर भर द्यावा. त्याचबरोबर दुर्धर आजारासाठी रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेतून उपचार घेता येतात. मात्र रुग्णांच्या प्रवासाचा, राहण्याचा किंवा इतर औषधोपचारासाठी खर्च करण्याची अनेक रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसते. त्यामुळे अशा रुग्णांना या निधीतून आरोग्यासाठी काही तरतूद करावी असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर वसंतराव नाईक मेडिकल कॉलेजला दरवर्षी एक कोटी रुपये देण्यात यावे अशी मागणी यावेळी आमदार मदन येरावर यांनी केली. त्याला लगेच नियामक परिषदेच्या सदस्यांनी होकार दिला. प्रत्यक्ष बाधित क्षेत्रातील वणी तालुक्यातील विकास कामांना प्राधान्य देण्याची मागणी आमदार संजयरेड्डी बोदकुरवार यांनी केली. याला पालकमंत्र्यांनी होकार देत वणी तालुक्यातील आरोग्य व्यवस्था, शाळा तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आरो वॉटर प्लांट चे नियोजन करण्यास सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ते ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. या निधीतून जिल्ह्यातील पांदण रस्त्यासाठी काही प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यास पांदण रस्त्यांच्या कामांना वेग मिळेल, असेही पालकमंत्री राठोड यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी