मे अखेरपर्यंत पन्नास टक्के कर्ज वाटप करावे -जिल्हाधिकारी अमोल येडगे

बॅंकर्स जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकित सूचना यवतमाळ, दि ११ मे (जिमाका):- खरीप हंगाम 2023 साठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. यावर्षी सर्व बँकांना मिळून दोन हजार कोटी रुपयांचा लक्षांक असून आजपर्यंत केवळ एकवीस टक्के कर्ज वाटप झाले आहे. ही रक्कम मागिल वर्षाच्या तुलनेत कमी असून सर्व बँकांनी त्यांना दिलेल्या लक्षांकाच्या ५० टक्के कर्ज वाटप मे अखेरपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे आज बॅंकर्सची जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी त्यांनी सदर सूचना दिल्यात. या बैठकिला नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दीपक पेंदाम, लिड बँक मॅनेजर अमर गजभिये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर ,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, आत्म्याचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, एस बी आय चे श्रिकांत कोहळे, बॅंक ऑफ बरोदा आर एम सोमकुवर, बॅंक ऑफ ईंडियाचे सचिनचंद्र पाटिदार, वायडीसीसी चे श्री सिद्दिकी तसेच इतर बँकांचे जिल्हा समन्वयक व अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी पीक कर्ज, पी एम किसान योजनेसाठी आधार सिडिंग महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, तसेच शासकीय अनुदानित योजनाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध झाल्यासच ते उपयुक्त ठरते. त्यांना बियाणे, खते आणि लागवडीची तयारी करण्यासाठी कर्जाची रक्कम कामी येते. त्यामुळे जुन अखेरपर्यंत पिक कर्जाचा १०० टक्के लक्षांक पूर्ण करण्याचा प्रयत्न बॅंकांनी करावा. यावर्षी केंद्र सरकार सोबतच राज्य सरकारसुद्धा पी एम किसान योजनेसारखी योजना राबवित आहे. त्यामुळे शेतक-यांचे ई- केवायसी आणि आधार सिडिंग करणे महत्वाचे आहे. जिल्ह्यात अद्याप ३६ हजार ८०६ पात्र शेतक-यांचे ई-केवायसी व आधार सीडिंग शिल्लक आहे. त्यापैकी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे सर्वाधिक २५ हजार २८० शेतकऱ्यांचे आधार ई -केवायसी व सीडिंगचे काम शिल्लक आहे. यांनी यासाठी विशेष व्यव्स्था करुन २५ मे पर्यंत सर्व बॅंकांनी आधार सीडिंग पूर्ण करावे. त्यासाठी ग्रामस्तरावर सुचना देऊन शेतक-यांची यादी आणि बॅंकेचे नाव कळवावे. तसेच यातील मयत अपात्र वगळण्याचे कामही पूर्ण करावे अशा सुचना त्यांनी दिल्यात. बैठकिला येतांना बॅंक प्रमुखांनी परिपूर्ण माहिती घेऊन उपस्थित रहावे असेही त्यांनी सांगितले. 00000 वृत्त क्रमांक : 200

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी