बालसंगोपन योजनेचा ९६८ बालकांना १ कोटी २५ लक्ष रुपयांचा लाभ वितरित नविन १०५० प्रस्तावाना मंजुरी प्रलंबित अर्ज निकाली काढण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना

यवतमाळ, दि १६ मे:- अनाथ, निराश्रीत, बेघर व अन्य आपत्तीत सापडलेल्या बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या हेतूने शासन बालसंगोपन योजना राबविते. जिल्ह्यात मार्च २०२३पर्यंत ९६८ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आलेला असून १ कोटी २५ लक्ष २४ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये बाल संगोपन योजनेसाठी २९४६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये शहरी भागातील ६६५ तर ग्रामीण भागातील २२८१ प्रस्तावाचा समावेश आहे. यापैकी १२३३ प्रस्तावांची गृह चौकशी पूर्ण झाली असून १०५० प्रकरणात सी डब्ल्यू सी ने बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचे आदेश केलेले आहेत अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात यांनी बैठकित दिली. यावेळी उर्वरित १७१३ प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती मधील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांनी गृह चौकशी तात्काळ करण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना आदेश द्यावेत, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर शाळा बाह्य मुले, रस्त्यावरची मुले, आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बालसंगोपन योजना आढावा बैठकित बाल कल्याण समितीचे अध्यक्ष वासुदेव डायरे, बालकल्याण समिती सदस्य ॲड प्राची निलावार, वनिता शिरफुले, ॲड लीना ओक, फाल्गुन पालकर, माधुरी पावडे, देवेंद्र राजुरकर स्वप्नील शेटे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी