दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, युवकांना स्वयंरोजगारासाठी सहाय्य

यवतमाळ, दि २५:- दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांच्या व्यंगत्वावर मात करत त्यांचे जीवनमान सुकर करण्यासाठी शासनाच्यावतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसह युवकांना स्वयंरोजगार करून स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी अर्थसहाय्याच्या योजनांचा समावेश आहे. दिव्यांगांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांमध्ये शालांतपूर्व शिक्षणासाठी दिव्यांग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देणे योजनेचा समावेश आहे. योजनेंतर्गत अंध, अंशत: अंध, अस्थिविकलांग, कुष्ठरुग्णमुक्त, कर्णबधिर, इत्यादीच्या इयत्ता १ ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 100 रुपये, इयत्ता 5 ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना दरमहा 150, इयत्ता 8 वी ते 10 च्या विद्यार्थ्यांना दर दरमहा 200 रुपये तर दिव्यांग कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थ्याना दरमहा 300 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थी एकाच इयत्तेत दोन वेळा नापास झालेला नसावा. तसेच मतिमंद व मानसिक आजाराच्या विशेष शाळांतील 18 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्याना दरमहा 150 रु शिष्यवृत्ती देण्यात येते. मॅट्रीकोत्तर शिक्षणासाठी सुद्धा दिव्यांग विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती दिली जाते. यात वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी, ॲग्रीकल्चर, व्हेटरनरी पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 1 हजार 200 तर वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 550 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. कला, विज्ञान, वाणिज्य मधील पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमाच्या वसतिगृहात राहणाऱ्यांना दरमहा 820 तर वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा 530 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार करता यावा यासाठी वित्तीय सहाय्य योजना राबविली जाते. यासाठी वार्षिक उपन्न 1 लाखापेक्षा कमी असावे. वय 18 ते 50 वर्ष यामधील असावे. योजनेंतर्गत रुपये 1 लाख 50 हजार रुपयापर्यंतच्या व्यवसायाकरिता 80 टक्के बॅकेमार्फत कर्ज व 20 टक्के अथवा कमाल रुपये 30 हजार पर्यंत अनुदान स्वरुपात अर्थसहाय्य दिले जाते. दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास सहाय्य या योजनेंतर्गत दिव्यांग वधू किंवा वराने दिव्यांगत्व नसलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास अथवा दिव्यांगत्व नसलेल्या वधू किंवा वराने दिव्यांगत्व असलेल्या वधू किंवा वराशी विवाह केल्यास अर्थसहाय्य देण्यात येते. अर्थसहाय्यामध्ये 25 हजाराचे बचत प्रमाणपत्र, 20 हजार रोख, 4 हजार 500 संसार उपयोगी वस्तु तर 500 रुपये स्वागत समारंभ खर्चासाठी देण्यात येते. यासाठी विहीत नमुन्यातील अर्जासोबत विवाह नोंदणी दाखला, वर, वधूचे शाळा सोडल्याचे दाखले, एकत्रित लग्नाचा फोटा, अधिवास प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी