प्रलंबित कृषी पंप वीज जोडण्या ३० जुनपर्यंत पूर्ण करा -जिल्हाधिकारी

यवतमाळ दि २५ मे जिमाका:- कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी पैशांचा भरणा करूनही मार्च २०२२ पर्यंत प्रलंबित असलेल्या सर्व जोडण्या ३० जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात. महावितरणच्या विविध विषयांचा आढावा आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महसुल भवन येथे घेतला. यावेळी माहावितरणचे अधिक्षक अभियंता प्रकाश राऊत, यवतमाळ विभागाचे कार्यकारी अभियंता संजय खंगार, पुसद चे कार्यकारी अभियंता संजय आडे, पांढरकवडा नरेंद्र कटारे, दारव्ह्याचे योगेश तायडे उपस्थित होते. कृषी पंपाच्या विज जोडणीसाठी जिल्ह्यात एकूण १० हजार ५६५ प्रस्ताव मार्च २०२२ पर्यंत प्रलंबित होते. यात दारव्हा विभागात २८६६ प्रलंबित अर्जापैकी ९१६ अर्ज मंजुर केले असुन ३१७ अर्ज रद्द केले तर १६३३ अर्ज प्रलंबित आहे. तसेच पांढरकवडा विभागात १९५४ प्रलंबित अर्जांपैकी १६५ अर्ज रद्द केले होते तर ९१८ लोकांना वीज जोडणी दिली आहे ८७१ अर्ज प्रलंबित आहेत व सर्व विभागात ३५९३ प्रलंबित अर्जांपैकी ३४४ अर्ज रद्द करण्यात आले तर एकूण ११९१ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली असुन २०५८ अर्ज प्रलंबित आहेत. यवतमाळ तालुक्यात यवतमाळ उपविभागात २१५२ प्रलंबित अर्जापैकी २५१ अर्ज रद्द करण्यात आले, ५५५ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली, तर १३४६ अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत. जिल्हाधिकारी यांनी प्रलंबित असलेले मार्च २०२२ पर्यंतचे पैसे भरूनही प्रलंबित असलेले वीज जोडणीचे ५९०८ प्रस्ताव ३० जुन पर्यंत तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्यात. याचबरोबर बिरसा मुंडा कृषी स्वावलंबन योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विहिरी देण्यात आलेल्या आहेत. या विहिरींना कृषी पंपाच्यासाठी वीज जोडणी करण्यासाठी मार्गदर्शन करावे, त्यांना योग्य माहिती देऊन त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात यावेत असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. शिवाय शासन आपल्या दारी उपक्रमामध्ये सर्व योजनांची जनजागृती करण्याचे आदेश त्यांनी दिले महावितरणची सर्व दुरुस्तीची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करावेत यामध्ये झाडांची छाटणी, रोहित्र दुरुस्ती, फिडर तपासणी इत्यादी कामाचा समावेश करावा. त्याचबरोबर दुरुस्ती करताना मजूर किंवा लाईनमन यांच्या सुरक्षिततेसंदर्भात काळजी घेण्यात यावी. सुरक्षिततेची सर्व साधने त्यांना पुरवावीत. यामध्ये जीवित हानी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. शासकीय इमारतीमध्ये प्राधान्याने वीज जोडणे देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्यात. स्ट्रीट लाईट व पाण्याची बिल भरण्यासाठी ग्रामपंचायततिला तगादा लावू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी