ग्रामिण भागातील महिलांना रोजगार देण्यासाठी कॉटन टू क्लॉथ प्रकल्प राबवावा -खा. भावना गवळी

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा)बैठक यवतमाळ, दि २२ मे जिमाका:- ग्रामिण महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासोबतच उदरनिर्वाहासाठी कापसावर आधारित 'कॉटन टु क्लॉथ' हातमाग प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या अध्यक्षा खासदार भावना गवळी यांनी आज दिल्यात. जिल्हा परिषदेच्य्या सभागृहात आज जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक खासदार भावना गवळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या बैठकीला आमदार मदन येरावर, आमदार इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ सहाय्यक जिल्हाधिकारी मेघा कवळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी वैशाली रसाळ उपस्थित होत्या. आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होते. त्यामुळे कापसावर आधारित लघुउद्योग गावातच उभे राहिल्यास ग्रामीण भागातील बेरोजगारांसाठी सुद्धा उपयुक्त ठरेल. यासाठी महिलांना तशा पद्धतीचे प्रशिक्षण देणे आवश्यक असुन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिलांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. त्याचबरोबर या उपक्रमात कौशल्य विकास विभाग, गावातील सरपंच आणि सचिवांचा सहभाग घ्यावा असेही त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामीण भागात केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा त्यांनी आढावा घेतला. यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, स्वच्छ भारत मिशन, ग्रामीण पेयजल कार्यक्रम, जल जिवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री उज्वला योजना, एकात्मिक बालविकास कार्यक्रम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, शालेय पोषण आहार, तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तसेच विभागाअंतर्गत येत असलेल्या इतर योजनांचा आढावा घेतला. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा आढावा घेताना खासदार गवळी यांनी यावर्षी ग्रामसेवकांच्या बहिष्कारामुळे रोहयोची कामे उशिरा सुरू करण्यात आली. त्यामुळे विहिरींची कामे मागे राहिली असून ती येत्या दीड महिन्यात विशेष लक्ष देऊन पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. तसेच विहिरींसाठी कुशल बाबीचा निधी देण्याला प्राधान्य देण्यास त्यांनी सांगितले. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा आढावा घेताना, त्यांनी या योजनेपासून एकही गरीब महिला वंचित राहता कामा नये असे सांगून, ग्रामीण भागातील अनेक महिलांकडे डॉक्टरकडे जाऊन तपासणी करण्याला सुद्धा पैसे नसतात. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले. जिल्ह्यात सिकलसेल आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच या आजाराच्या वाहकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे सिकलसेल डिटेक्शनसाठी आवश्यक किट सेंस निधीतुन उपलब्ध करून घेण्यात यावी. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अतिक्रमण नियमानुकूल करूनही ज्यांच्याकडे जागा नाही, परंतु त्यांना घरकुल मंजूर झालेले आहे, अशा लाभार्थ्यांना ज्या गावात ई वर्ग जागा उपलब्ध आहे आणि त्याचा वापर होत नाही अशा ठिकाणी लाभार्थ्यांची मागणी लक्षात घेता ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रस्ताव ठेवण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्यात. या बैठकिला जिल्हा परिषद तसेच राज्यशासनाचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी