जिल्ह्यातील 15 लक्ष नागरिकांना मिळणार लाभ - पालकमंत्री मदन येरावार




v ग्रामीण आणि शहरी भागातील 3 लक्ष 86 हजार कुटुंब पात्र
      यवतमाळ, दि. 23 : अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांमध्ये आता आरोग्य आणि शिक्षण याचांसुध्दा समावेश झाला आहे. सामान्य नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ ही अत्यंत महत्वाची योजना आहे. संपूर्ण देशात एकाच वेळी या महत्वाकांक्षी योजनेचे लोकार्पण हा देशासाठी गौरवाचा क्षण आहे. आपल्या जिल्ह्यातही या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील एकूण 3 लक्ष 86 हजार 544 कुटुंब पात्र ठरले आहेत. या कुटुंबातील जवळपास 15 लक्ष नागरिकांना ‘आयुष्यमान भारत’ या योजनेचा लाभ घेता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
            नियोजन भवन येथे ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा’ शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण आदी उपस्थित होते.
            देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रांची (झारखंड) येथे या योजनेचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ केला, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून देशातील 50 कोटी जनतेला पतंप्रधानांनी आरोग्याचे विमा सुरक्षा कवच दिले आहे. 1122 प्रकारचे उपचार या योजनेत समाविष्ट असून राज्याच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेव्यतिरिक्त अनेक उपचारांचा यात समावेश आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार मानसाचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्टीने विकास म्हणजेच आरोग्यमुक्त राहणे होय. जिल्ह्यातील आरोग्यसुविधा आधुनिक करण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक सुविधांचा नागरिक लाभ घेत आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालय, शवविच्छेदनगृह नुतणीकरण, एमआरआय मशीन, दहा डायलेसिस मशीन, केमोथेरेपी, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सोयीसुविधायुक्त सभागृह आदींचा यात समावेश आहे. आरोग्याच्या योजनांची माहिती आशा स्वयंसेविका, आरोग्य दूत, अंगणवाडी सेविका आदींनी तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
            यावेळी मान्यवरांच्या हस्ते अजय ढोंगे, बबिता दुर्गे, ज्योती ठाकरे, चंदु रावेकर, कामिना ढोंगे, ओम ढोंगे, लक्ष्मी तेलंग, ऐजाज खान, हर्षल ठाकरे, उषा जायरे, बेबी सहारे, गजानन बेंद्रे यांना ‘आयुष्यमान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे’ ई-कार्ड देण्यात आले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रांची (झारखंड) येथील या योजनेच्या राष्ट्रीय शुभारंभाचे थेट प्रक्षेपण उपस्थितांना दाखविण्यात आले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले. संचालन प्रशांत पाटील यांनी तर आभार निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. कोषटवार यांनी मानले. कार्यक्रमाला न.प. आरोग्य सभापती दिनेश चिंडाले, रेखा कोठेकर, माया शेरे, आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. मुकेश मारू, दर्शन चांडक, डॉ. टी.सी. राठोड यांच्यासह नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थीनी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे सदस्य आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी