जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय मदत कक्ष


यवतमाळ, दि. 04 : जिल्ह्यातील गोर-गरीब व सामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचाराबाबत आवश्यक माहिती, शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा आदींबाबत माहिती होण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय मदत कक्ष उघडण्यात आला आहे.
गत आठवड्यात बाभुळगाव तालुक्यातील दाभा (पहूर) येथील 13 महिन्याच्या चिमुकल्यावर नागपूर येथील नामांकित गेट वेल हॉस्पीटलमध्ये ‘कोलोस्टॉमी’ या शस्त्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पुढाकार घेतला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी नागपूरच्या डॉक्टरांसोबत स्वत: संपर्क करून सदर शस्त्रक्रीया शासकीय योजनेतून करावी, असे सांगितल्यावर 24 तासाच्या आत बाळावर यशस्वी शस्त्रक्रीया करण्यात आली. महात्मा फुले जनआरोग्य अभियानांतर्गत शस्त्रक्रीयेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत डॉक्टरांना सांगितले होते. त्यामुळे या योजनेंतर्गत जिल्ह्यातील इतरही गरजू व गरीब रुग्णांना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून योग्य मदत करता येते. या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयात वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 1 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा दारिद्र्य रेषेखालील पिवळे शिधापत्रिकाधारक, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक, केशरी शिधापत्रिकाधारक यांचा या योजनेत समावेश आहे. या योजनेंतर्गत 971 उपचार व 121 पाठपूरावा सेवांचा समावेश आहे. विमाहप्ता शासनामार्फत भरला जातो. रुग्णालयात सर्व सेवा नि:शुल्क मिळतात. लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्षी दीड लाखापर्यंत विमा संरक्षण, मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा 2.50 लक्ष रुपयांपर्यंत आहे. विमा रकमेच्या मर्यादेत कुटुंबातील सर्व व्यक्तिंना लाभ घेता येतो. रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी आरोग्य मित्रांची उपलब्धता जवळच्या अंगीकृत रुग्णालयात वैध शिधापत्रिका तसेच शासनमान्य ओळखपत्र (मुळ स्वरूपात) उदा. आधारकार्ड, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, निवडणूक ओळखपत्र दाखवून योजनेचा लाभ घेता येतो.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रीया, मुत्रपिंड व मुत्रमार्ग विकार शस्त्रक्रीया, मेंदु व मज्जासंस्था विकार, अस्थिव्यंग, जठार व आतडे, शस्त्रक्रीया, प्लास्टिक सर्जरी, जाळीत, बालरोग, त्वचारोग, नेत्र शस्त्रक्रीया (मोतीबिंदू वगळून), कृत्रिम अवयव, फुफ्फुस आजारावरील उपचार, एंडोक्राईन, इंटरव्हेंशनल रेडीओलॉजी व होमॅटॉलॉजी आदींचा समावेश आहे.
या योजनेत उपचार  घेण्यासाठी रुग्णालयात जातांना वैध शिधापत्रिका (रेशनकार्ड) घेऊन जावे. आपले फोटो ओळखपत्र (फोटो आयडी) असणे आवश्यक आहे. वैद्यकीय सेवेत आंतररुग्ण उपचार, 121 उपचारांसाठी पाठपूरावा सेवा, औषधे, कंझुमेबल्स व झिस्पोझेबल्स, निदानासाठी आवश्यक तपासण्या, शुश्रृषा, भोजन, मुलभुत सेवा शस्त्रक्रीया, एक वेळचा परतीचा प्रवास देण्यात येतो. नोंदणी करीता केशरी शिधापत्रिकेची मुळप्रत, पिवळी शिधापत्रिका मुळप्रत, शुभ्र शिधापत्रिका (शेतीचा 7/12 आवश्यक), शासनमान्य ओळखपत्र (आधारकार्ड, मतदानकार्ड इतर), 6 वर्षाखालील वयोगटाकरीता जन्म दाखला आवश्यक आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षाचा नागरिकांनी सल्ला घ्यावा. तसेच या कक्षात कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब-गरजू व सामान्य नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.मुकेश मारू यांच्याशी तसेच टोल फ्री क्रमांक 18002332200 या क्रमांकावर संपर्क करावा.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी