नीलक्रांती योजनेतून शेतक-यांची आर्थिक क्रांती होणार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख




v बचत भवन येथे मत्स्यशेती व्यवसायाबाबत कार्यशाळा
यवतमाळ दि.12 : आपला जिल्हा हा संपूर्णत: खरीपाच्या शेतीवर अवलंबून आहे. निसर्गाच्या संकटांचा सामना करीत जिल्ह्यातील शेतक-यांना शेती करावी लागते. अशा परिस्थितीत पारंपरिक शेती करतांना मस्त्यशेती, रेशीम, कुक्कुटपालन आदींचा विचार करणे गरजेचे आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या जलसाठ्यामुळे मत्स्यशेतीला जिल्ह्यात भरपूर वाव आहे. त्यामुळे नीलक्रांती योजनेंतर्गत मत्स्यशेतीच्या माध्यमातून शेतक-यांची आर्थिक क्रांती होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त कार्यालय, कृषी समृध्दी प्रकल्प (केम) आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्यशेतीबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय शिकरे, सहायक आयुक्त सुखदेवे, केमचे प्रकल्प संचालक देवानंद खांदवे, टाटा ट्रस्टचे प्रतिनिधी नंदकिशोर इंगोले, भोपाळ येथील विद्यापीठाचे माजी प्राध्यापक डॉ. बेलसरे आदी उपस्थित होते.
मत्स्यशेती करण्यास जिल्ह्यातील शेतकरी उत्सुक आहे, हे येथे आलेल्या शेतक-यांच्या संख्येवरून लक्षात येते, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, जिल्ह्यात साडेसहा हजारांच्या वर शेततळ्यांची निर्मिती झाली आहे. त्यापैकी एक हजार शेततळ्यांमध्ये मत्स्यशेती करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात सर्व विभागाचे व इतर असे एकूण 500 जलाशय आहेत. यातून निर्माण झालेल्या जवळपास 25 हजार हेक्टर जलसंचयात मत्स्यशेती करता येऊ शकते. नियोजन समितीच्या निधीतून बेंबळा आणि अरुणावती येथे मत्स्यशेती बीज प्रकल्प उभारण्यात आले आहेत. शेततळ्यात मत्स्यशेती याव्यतिरिक्त नीलक्रांती योजनेंतर्गत जिल्ह्यात एक हजार लाभार्थी निर्माण करण्यासाठी संबंधित विभागाने प्रयत्न करावे. नीलक्रांतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतक-यांना आर्थिक समृध्दी देणारा वेगळा पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
यावेळी मत्स्यव्यवसाय विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. विजय शिकरे यांनी नीलक्रांती योजनेबाबत मार्गदर्शन केले. या अंतर्गत मत्स्यव्यवसायाचे प्रकार, शोभिवंत माशांचे संवर्धन, पिंज-यातील मत्स्यसंवर्धन, जागेची निवड व पाणी व्यवस्थापन, पाणी व मातीचे गुणधर्म, तलावाची रचना व बांधकाम, तलावात बोटुकलीचे संचयन, मत्स्यबिजाचे प्रकार, खाद्य व्यवस्थापन, मत्स्यव्यवसायाबाबत शासनाच्या विविध योजना आदींचे सादरीकरण केले. यावेळी केमचे प्रकल्प संचालक देवानंद खांदवे, सहायक आयुक्त सुखदेवे आदींनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक टाटा ट्रस्टचे नंदकिशोर इंगोले यांनी तर संचालन श्यामल नवघरे यांनी केले. कार्यक्रमाला मत्स्यव्यवसाईक सहकारी संघटनेचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी