स्क्रब टायफस बरा होऊ शकतो……

विशेष लेख
          यवतमाळ : अनेक रोगांची उत्पत्ती ही पावसाळ्यात होत असते. यात प्रामुख्याने मलेरिया, स्वाईन फ्लू, डेंगी या साथीच्या रोगांचा समावेश असतो. यावेळेस मात्र विदर्भात ‘स्क्रब टायफस’ या रोगाने थैमान घातले आहे. यवतमाळ, नागपूर, वर्धा, गोंदिया आदी जिल्ह्यात कमीजास्त प्रमाणात या रोगाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये या रोगाबाबत भितीचे वातावरण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र असे असले तरी वेळीच उपचार, वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक उपाययोजना केल्या तर ‘स्क्रब टायफस’ पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी गरज आहे, ती केवळ अलर्ट राहण्याची.   
‘स्क्रब टायफस’ या आजाराची सर्वात प्रथम ओळख 1930 मध्ये जपानमध्ये झाली. जगातील अनेक डोंगराळ प्रदेशात या रोगाचे जीवाणू आढळतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भारत आणि नेपाळच्या पहाडी भागात या रोगाचे जीवाणू प्रामुख्याने निदर्शनास येतात. मात्र यावेळेस विदर्भात याचा शिरकाव झाला आहे. ‘स्क्रब टायफस’ हा एकप्रकारे प्रचंड तापाचा प्रकार असून साधारणत: पाण्याचा साठा असलेल्या जागी वाढणा-या ‘ओरिएंटा सुसुगामुशी’ नामक किड्याच्या चावण्यामुळे हा आजार होतो. पावसाळी वातावरणात जंगल, शेत आणि दाट गवताच्या ठिकाणी या किड्यांची उत्पत्ती होते व तेथेच हे किडे वाढतात. किडा चावल्यानंतर त्याच्या लाळेतील ‘रिक्टशिया सुसुगामुशी’ हा घातक जंतू मानवी रक्तात पसरतो. त्यामुळे यकृत, मेंदू आणि फुफ्फुसावर विपरीत परिणाम होतो. परिणामी  प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मनुष्याची प्रतिकारशक्ती कमी होते.
स्क्रब टायफसची लक्षणे : या रोगाचे संक्रमण झालेल्या रुग्णात अनेक प्रकारची लक्षणे आढळतात. यात प्रामुख्याने किडा चावल्याने त्या ठिकाणी काळा डाग पडणे, रुग्णाला प्रचंड ताप येणे (40 ते 40.5 अंश सेल्सीअस किंवा 104 ते 105 अंश फॅरनहिट), शरीरातील नसांमधील दुखणे वाढणे तसेच कमजोरी येणे, घाबरल्या सारखे वाटणे, भुख न लागणे, खाण्याची इच्छा न होणे, पोट बिघडणे, याशिवाय गंभीर अवस्थेमध्ये प्लेटलेट्सची संख्यासुध्दा घटते. विशेष म्हणजे ही सर्व लक्षणे साथीच्या इतर रोगांप्रमाणेच असल्यामुळे साधारणत: आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला ‘स्क्रब टायफस’ होऊ शकतो, अशी कल्पनासुध्दा आपल्या मनात येत नाही. त्यामुळे वरील लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणे आणि विशिष्ट प्रकारच्या रक्त तपासणीतून या रोगाचे निदान करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करणे, हेच सर्वोत्तम आहे.
       कोणती काळजी घ्यावी : पावसाळ्याच्या दिवसात घराशेजारी आपोआपच जंगली झाडेझुडपी वाढत असतात. ही झाडे वाढू न देणे किंवा त्याची नियमित साफसफाई करणे, या झाडाझुडपांमध्ये जायची गरजच पडली तर बुट आणि हातमोजांचा उपयोग करणे, संपूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे अंगावर घालणे, आजूबाजूला पाणी जमा न होऊ देणे, परिसरात डी.डी.टी. पावडर वारंवार शिंपडणे, दोन-तीन दिवसांपेक्षा अधिक ताप राहिला तर त्वरीत वैद्यकीय उपचार घेणे.
            घरगुती उपचार : या आजारावर घरगुती उपचारसुध्दा करता येतो. यात प्रामुख्याने दुधात हळद टाकून प्यावे, मेथीची पाने पाण्यात भिजवून पाणी गाळून प्यावे. मेथी पावडरही पाण्यात टाकून घेता येते. या उपचारांनी ताप कमी होण्यास मदत होते शिवाय शरीरातील वेदनासुध्दा कमी होतात. वैद्यकीय उपचारामध्ये या आजारासाठी आवश्यक असलेली डॉक्सीसायक्लीन ही गोळीही सहज उपलब्ध असून स्वस्त दरात मिळते. त्यामुळे नागरिकांनो ! घाबरू नका, ‘स्क्रब टायफस’ हा पूर्णपणे बरा होऊ शकतो.
                                                                        राजेश येसनकर, जिल्हा माहिती अधिकारी, यवतमाळ

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी