स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी – पालकमंत्री येरावार





v घोडखिंडी येथे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा शुभारंभ
यवतमाळ दि.15 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘क्विट इंडिया’ सोबतच ‘क्लिन इंडिया’ चा नारा दिला होता. संत गाडगे महाराज यांनी गावागावात स्वच्छतेचा जागर केला. हे दोन्ही महात्मे स्वच्छतेचे दूत आहेत. गाव, जिल्हा, देश यांचा विकास करण्यासाठी स्वच्छता ही महत्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी करण्यासाठी स्वच्छता ही लोकचळवळ होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
घोडखिंडी (पांढरी) येथे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत आयोजित श्रमदान स्वच्छतेसाठी या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, सदस्या रेणू शिंदे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगिरवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चौधर, गटविकास अधिकारी अमित राठोड, गावचे सरपंच श्रीराम मंदीलकर, उपसरपंचा पुष्पा पातोडे आदी उपस्थित होते.
येत्या 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशात ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरून स्वच्छ भारत मिशन, घरोघरी शौचालय हे जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विषय समजावून सांगितले. पहिले सुख हे निरोगी राहण्यात असते आणि निरोगी राहणे हे केवळ स्वच्छतेमुळे शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, चांगल्या दर्जाचे शिक्षण, मुलभूत सुविधा आदी करण्यावर शासनाचा भर आहे. 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी घरकुलच्या ‘ड’ यादीचा सर्व्हे सुरू आहे, असे त्यांनी सांगितले
प्रत्येकाने स्वच्छता राखली तर साथीचे आजार होणार नाही. गावच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला 14 व्या वित्त आयोगामधून 14 लाख रुपयांचा निधी देण्यात येतो. उपेक्षित माणसाच्या दारापर्यंत विकासाचा रथ पोहचला पाहिजे, असा सरकारचा मानस आहे. कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेचे नियोजन महिला उत्तम प्रकारे करू शकतात. महिला बचत गटाची एक मोठी शक्ती उदयास आली आहे. सरकारही महिला बचत गटांना प्रोत्साहन देत आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते महिला बचत गटांना स्वच्छता कुंडी व हॅन्डवॉश किटचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी गावातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. तसेच सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तमराव बनसोड यांनी केले. संचालन एस.एम. नरवाडे यांनी तर आभार ग्रामसेवक डाखोरे यांनी मानले. कार्यक्रमाला पोलिस पाटील पुरुषोत्तम माजरे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष शंकर भुजाडे, तालुका कृषी अधिकारी राऊत यांच्यासह नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी