येत्या दहा दिवसांत बँकांनी पीक कर्जवाटपाची गती वाढवावी - किशोर तिवारी



यवतमाळ, दि. 21 : खरीप पीक कर्ज वाटपाचे जिल्ह्याला मिळालेल्या उद्दिष्टापैकी सरासरी 54 टक्के कर्जवाटप झाले आहे. यात काही बँकांनी अतिशय उत्तम कामगिरी केली असून काही बँकाची कामगिरी मात्र निराशाजनक आहे. त्यामुळे या बँकानी उर्वरीत दिवसांत पीक कर्जवाटपाची गती वाढवावी, अशा सुचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात बँकर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक जयंत घोडखांदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, सहकारी संस्थेचे उपजिल्हानिबंधक गौतम वर्धन आदी उपस्थित होते.
            पीक कर्ज वाटपात जिल्हा अव्वल आहे, असे सांगून किशोर तिवारी म्हणाले, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा यांनी कर्ज वाटपाची कामगिरी सुधारावी. या बँकांची कर्ज वाटपाची सरासरी अनुक्रमे 12 टक्के, 22 टक्के आणि 23 टक्के आहे. इतर राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांनी 60 ते 70 टक्के कर्ज वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तर 80 टक्के वाटप केले असून उर्वरीत काळात त्यांना आणखी कर्ज वाटायचे आहे. बँक ऑफ इंडियाच्या जिल्ह्यातील सर्व शाखेच्या व्यवस्थापकांची जिल्हा समन्वयाकांनी तातडीने बैठक घेऊन कर्ज वाटपाचे निर्देश द्यावे. बँकाकडून पीक कर्ज वाटप मेळावे घेतल्यानंतर कर्ज वाटपाची गती वाढली आहे. मात्र अजूनही काही पात्र शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहे. सर्व पात्र शेतक-यांना त्वरीत पीक कर्ज वाटप करा, असे आदेश किशोर तिवारी यांनी दिले.
            यावेळी बोलतांना खासदार भावना गवळी म्हणाल्या, शेतक-यांना तातडीने कर्ज वाटप होणे गरजेचे आहे. काही ठिकाणी शेतकरी बँकामधून परत पाठविले जात आहे. याकडे बँकेच्या वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष द्यावे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, ज्या बँकेची टक्केवारी अतिशय कमी आहे, अशा बँकांच्या प्रादेशिक व्यवस्थापकांनी यात लक्ष द्यावे. दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी त्यांनी उर्वरीत दिवसांत पीक कर्ज वाटपालाच प्राधान्य देणे गरजेचे आहे. जिल्ह्यात स्टेट बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँकेने पीक कर्ज वाटपाबाबत चांगले उपक्रम राबविले आहे. इतरही बँकांनी त्याचे अनुकरण करावे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कर्ज वाटपाचा आकडा 550 कोटी करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक यांनी याबाबत पाठपुरावा करावा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.
            यावेळी राष्ट्रीयकृत, खाजगी, विदर्भ कोकण ग्रामीण बँकचे प्रतिनिधी तसेच अधिकारी उपस्थित होते.
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी