21 ते 30 ऑक्टोबर दरम्यान मोतिबिंदु रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रीया


* जास्तीत जास्त रुग्णांनी नोंदणी करण्याचे आवाहन
यवतमाळ दि.11: मोतिबिंदु मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत 21 ते 30 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील मोतिबिंदु रुग्णांची तपासणी व शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. त्यासाठी महसूल राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री संजय राठोड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक तात्याराव लहाने व जे.जे.हॉस्पिटलच्या नेत्ररोग विभाग प्रमुख रागिणी पारेख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक घेण्यात आली.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मनिष श्रीगिरीवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील 1 हजार मोतिबिंदु रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर शस्त्रक्रीया केली जाईल. शस्त्रक्रीयेस पात्र रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय एकूण वैद्यकीय शासकीय महाविद्यालय येथे शस्त्रक्रीयेसाठी घेऊन जाण्यासाठी वाहनाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या रुग्णांच्या शस्त्रक्रीया येथे करणे शक्य होणार नाही, अशा रुग्णांना मुंबई येथील जे.जे. रुग्णालयात पाठवून उपचार करण्यात येतील.
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये मोतिबिंदुचा सर्व्हे करण्यात येणार आहे. ज्यांना मोतिबिंदु आहे, अशा रुग्णांवर मोफत नेत्रभिंगारोपन शस्त्रक्रीया केली जाणार आहे. त्याकरीता सर्व रुग्णांनी आपली तपासणी करून त्यांची नोंद करून घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णामध्ये असलेल्या नेत्रचिकित्सा अधिकाऱ्यांकडे सदर तपासणी व नोंदणी करता येईल.
जिल्ह्यातील नेत्ररोग आजार असलेल्या रुग्णांनी शिबीराच्या स्थळी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे जाऊन तपासणी करून घ्यावी व या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी