केंद्र सरकारच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा - केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर




v सर्वांसाठी घरे व प्रत्येक घराला वीज प्राधान्याचे विषय
v जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक
      यवतमाळ, दि. 25 : सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचविणे हे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाचे काम आहे. सन 2022 पर्यंत प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे तर सौभाग्य योजनेंतर्गत 100 टक्के वीज कनेक्शन हे केंद्र शासनाचे प्राधान्याचे विषय आहेत. याशिवाय केंद्राच्या इतरही योजना महत्वाच्या असून या योजनांची सर्वांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले.
            नियोजन सभागृहात आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, आमदार सर्वश्री मनोहर नाईक, डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजू तोडसाम, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.
            सर्वांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजना (शहरी व ग्रामीण) ही अतिशय महत्वाची योजना आहे, असे सांगून केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर म्हणाले, घरकुल संदर्भात जमिनीचा प्रश्न बहुतांशी निकाली निघाला आहे. तसेच जमीन खरेदीसाठी दिनदयाल उपाध्याय योजनेंतर्गत 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्यसुध्दा करण्यात येते. नगर पालिका क्षेत्रात आखीव पत्रिका, नमुना ८-अ संदर्भात मुख्याधिका-यांनी त्वरीत बैठक घेऊन शहरी भागातील रखडलेले घरकुल पूर्ण करावे. सौभाग्य योजनेंतर्गत देशातील प्रत्येक घरात वीज देण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे. हा विषय नगर पालिका मुख्याधिकारी आणि गटविकास अधिका-यांनी समजून घ्यावा. शौच्छालयाच्या अनुदानासाठी नागरिकांच्या तक्रारींची वाट पाहू नका. शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचे लाभार्थ्यांना त्वरीत वाटप करा, असेही ते म्हणाले.
            शहरी आजिविका अभियानांतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या तरुण – तरुणींना नोकरी व्यतिरिक्त बँकेचे कर्ज मिळवून देण्यास पालिका मुख्याधिका-यांनी सहकार्य करावे. यासंदर्भात बँकेच्या अधिका-यांना बोलावून आपापल्या भागात मेळावे घेणे गरजेचे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घाटंजी तालुक्यातील कोळी (बु.) येथील बचत गटाच्या महिलांशी थेट संवाद साधला होता. बचत गटांची चळवळ मोठी झाली आहे. त्यामुळे शहरी भागात नगर पालिकांनी बचत गटांची निर्मिती करावी. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या राबविण्यात येणा-या योजना रखडल्या असतील तर त्याबाबत त्वरीत प्रस्ताव सादर करावा. पिण्याच्या पाण्यासाठी गावांत एटीएम आरओ लावण्याचे नियोजन करा. उज्वला गॅस योजनेंतर्गत कनेक्शनधारकांची संख्या वाढत आहे. त्यासाठी एजंन्सीचीसुध्दा संख्या वाढविण्यावर तालुका पुरवठा अधिका-यांनी भर द्यावा. तसेच गावक-यांना सिलिंडरचा तुटवडा भासणार नाही, याकडे लक्ष द्यावे. शासनाने ज्वारी, उडीद व मका यांचे हमीभाव वाढविले आहे. त्यामुळे जिल्ह्यात या पिकांचा पेरा वाढण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावे. रुग्णांसाठी औषधांचा तुटवडा जाणवणार नाही, याची काळजी घ्यावी. जिल्हा परिषदेच्या शाळेत सिकलसेल असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या शोधावी. असे विद्यार्थी आढळल्यास त्यांच्यावर नियमित उपचार करावे. तसेच अशा विद्यार्थ्यांना परिवहन महामंडळाच्या बसची पास मिळवून देण्यासाठी शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाने सहकार्य करावे, अशा सुचना केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी केल्या.
            केंद्र व राज्य शासनाच्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी – पालकमंत्री
केंद्र व राज्य सरकाच्या विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी येत आहे. 14 व्या वित्त आयोगात हा निधी तब्बल दहापट झाला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. ग्रामपंचायतींचा पाणी पुरवठ्याचा निधी 14 व्या वित्त आयोगातून भरण्याची तरतूद आहे. यापुढे ग्रामपंचायतीच्या सर्व पाणी पुरवठ्याच्या योजना सौर उर्जवर घेण्यात येईल. घरकुल योजनेसंदर्भात जमिनीच्या पट्ट्यांसाठी जमीन शोधावी. 14 व्या वित्त आयोगाचा किती पैसा ग्रामपंचातींकडे शिल्लक आहे, याची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी द्यावी, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी यांनी केले. बैठकीला विविध नगर पालिकांचे नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती, विविध विभागांचे प्रमुख, पालिकांचे मुख्याधिकारी, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, जिल्हा विकास व समन्वय समितीचे नवनिर्वाचित सदस्य आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी