डॉक्टरांनी पद्मश्री डॉ. लहानेंच्या वागणुकीचा आदर्श घ्यावा - पालकमंत्री मदन येरावार



यवतमाळ दि.08 : वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे जागतिक किर्तीचे व्यक्तिमत्व आहे. रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया करून त्यांनी अनेकांना दृष्टी प्रदान केली आहे. त्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. एवढे असूनही त्यांच्या वागण्यातील साधेपणा आणि रुग्णांसोबतचे त्यांचे सौहार्दाचे संबंध हे वाखाणण्याजोगे आहे. त्यांचे व्यक्तिमत्व हे समाजासाठी एक ‘रोल मॉडेल’ आहे. त्यामुळे डॉक्टरांनी पद्मश्री डॉ. लहानेंच्या वागणुकीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन  पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित बैठकीत डॉ. तात्याराव लहाने यांना सन्मानपत्र देतांना ते बोलत होते. यावेळी जे.जे. हॉस्पीटलच्या नेत्रशास्त्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. रागिनी पारेख, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत असतात, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, उपचारासाठी आलेल्या रुग्णांची आपुकीने विचारपूस केली तर अर्धा आजार असाच बरा होतो. त्यातून संबंधित रुग्णाला वेगळेच समाधान मिळते. वैद्यकीय महाविद्यालयात दररोज जवळपास 2200 रुग्णांची ओपीडी करण्यात येते. या रुग्णालयात अनेक आव्हानांचा सामना करून काम करावे लागते. तरीसुध्दा रुग्णसेवा देतांना सामाजिक बांधिलकी असणे गरजेचे आहे. येथील डॉक्टर्स रुग्णांना चांगली सेवा देत आले आहेत. भविष्यातही रुग्णांना त्यांच्याकडून चांगलीच सेवा मिळेल, असा विश्वास आहे.
गत काही वर्षात या महाविद्यालयाचा चेहरामोहरा बदलविण्यात आला आहे. अनेक आधुनिक सोयीसुविधा येथे निर्माण करण्यात आल्या असून खनीज विकास निधीतून दरवर्षी एक कोटी रुपये महाविद्यालयाला दिले जाते. याशिवाय 13 कोटी रुपये एमआरआय मशीनसाठी, शवविच्छेदनाच्या नुतणीकरणासाठी दीड कोटी रुपये, औषधी खरेदी व इतर बाबींकरीता निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्ण खाजगी रुग्णालयात न जाता येथे आला पाहिजे, यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावे. गोरगरिबांच्या उपचारासाठी येथे एकही पैसा कमी पडू देणार नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलतांना पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, या महाविद्यालयाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सदैव अग्रस्थानी असतात. औषध खरेदी, टेक्सीकॉलॉजी सेंटर आदी सुविधांसाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालय गरिबांची सेवा करण्यासाठी आहे. येथील उपचारातून गरिबांना न्याय मिळाला पाहिजे. औषधी, अनेक प्रकारच्या तपासण्या आदींसाठी विनाकारण रुग्णांना चकरा मारायला लावू नये. या महाविद्यालयाची सेवा 16 तालुक्यांसह जिल्ह्याबाहेरसुध्दा गेली पाहिजे. शासन वेतन तर देतेच मात्र रुग्णसेवेतून डॉक्टरांनी खरा आशिर्वाद मिळवावा. पुढील आठवड्यात जिल्ह्यात सर्व्हे करून नेत्रतपासणी करण्यात येईल. नेत्र विभागाशी संबंधित रुग्णांवर उपचार व आवश्यकता पडल्यास शस्त्रक्रिया केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना सन्मानपत्र देण्यात आले. तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार यांनी केले. कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर्स, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. *******

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी