स्पर्धा परीक्षेसाठी लोकराज्य उपयुक्त - उपमुख्य कार्य. अधिकारी जाधव



v लोकराज्य वाचक अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
      यवतमाळ, दि. 29 : प्रशासनात मोठ्या प्रमाणात अधिकारी हे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून येत असतात. या परिक्षेचा अभ्यासक्रम हा बहुतांशी निश्चित केला असला तरी अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त इतर बाबींचेसुध्दा ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी पुस्तकांसोबतच वृत्तपत्रे, मासिक आदींचा अभ्यास करावा लागतो. महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य हे त्यासाठी अतिशय उपयुक्त मासिक आहे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी केले.
            वडगाव रोडस्थति वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकराज्य वाचक अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या प्रविणा आडे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.
            वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेने विद्यार्थ्यांना इयत्ता 8 वीपासूनच स्पर्धा परिक्षेचा मार्ग दाखविला, ही गौरवाची बाब आहे, असे सांगून उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव म्हणाले, आमची पिढी पदवीनंतर स्पर्धा परीक्षेकडे वळली. या परिक्षेसाठी स्वत:ची कार्यक्षमता ओळखणे गरजेचे आहे. इयत्ता 8 ते 10 वी तील विद्यार्थी इतिहास, भुगोल, पंचायत राज, राज्यघटना आदी बाबी आतापासून शिक्षत आहेत. हा लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा पाया आहे. स्पर्धा परिक्षेसाठी नियमित अभ्यास करा तसेच व्यवस्थित मार्गदर्शन घ्या. भविष्यात आपल्याला काय व्हायचे, ते आजच ठरवा. स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन करणे गरजेचे आहे. तसेच आजच्या विद्यार्थ्यांनी स्वत:चे कौशल्यगुण ओळखून इतरही चांगल्या उपक्रमात सहभागी व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले, हरीतक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक आणि वसंत नाईक शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रतापसिंग आडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.  
            कार्यक्रमाचे संचालन प्रशांत जिन्नेवार यांनी तर आभार मोहम्मद सईद यांनी मानले. यावेळी शाळेतील अधिव्याख्याता सविता हजारे, शिला जगताप, अशपाक खान,   रजनी व्यास, जयश्री ठाकरे यांच्यासह शाळेतील नाना सावरकर, देवानंद राठोड तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी