विडूळ येथे एकाच छताखाली गणपती आणि मोहरम





सामाजिक एकतेचे आदर्श उदाहरण
* पोलिसांच्या प्रयत्नांना मिळाले यश
यवतमाळ दि.17 : सध्या संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधुम सुरु आहे. याच दरम्यान मोहरम हा धार्मिक सणसुध्दा आला आहे. या दोन्ही उत्सवाचे औचित्य साधून उमरखेड तालुक्यातील विडूळ येथील नागरिकांनी सामाजिक एकतेचे आदर्श उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. येथील नालसाहेब देवस्थानात एकाच वेळेस गणेशोत्सव आणि मोहरम साजरा करण्यात येत आहे. गणेशाच्या मुर्तीच्या बाजूलाच मोहरमची सवारी असून सामाजिक सलोख्याचे हे दृष्य बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
येथील नालसाहेब देवस्थानचे अध्यक्ष जयराम डांगे यांची 4 थी पिढी मोहरम हा उत्सव परंपरेने साजरा करतात. त्यांच्या घराण्यामध्ये 134 वर्षापासून ही परंपरा सुरु आहे. स्वत:च्या मालकीचे असलेले हे देवस्थान आता सार्वजनिक झाले आहे. 21 जानेवारी 2015 रोजी या संस्थेची रितसर नोंदणी धर्मदाय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यावर्षी गणेशोत्सव व मोहरम हे एकाच वेळेस साजरे करण्यात येत आहे. ही बाब हेरून जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या सुचनेनुसार उमरखेडचे ठाणेदार हनुमंत गायकवाड यांनी 8 सप्टेंबर 2018 रोजी विडूळ येथील ग्रामपंचायतीमध्ये शांतता समितीची बैठक घेतली. या बैठकीत पोलीस प्रशासनाच्यावतीने विडूळ येथील नालसाहेब देवस्थानात एकाच वेळी एकाच ठिकाणी गणेशोत्सव आणि मोहरम साजरा करण्याची अभिनव संकल्पना मांडली. लगेच सर्व सदस्यांनी यास होकार दिला. या बैठकीत सर्व धर्माचे बांधव सहभागी झाले होते. एकमुखाने निर्णय झाल्यानंतर 13 सप्टेंबर रोजी दोन ते अडीच फुटाच्या गणेशाच्या मुर्तीची येथे स्थापना करण्यात आली आहे. तर त्याच्याच बाजूला सव्वातीन फुटाची मोहरमची सवारी आहे.
दर 36 वर्षानी गणपती आणि मोहरम एकत्र येत असून सलग तीन वर्षे हे दोन्ही उत्सव एकत्र साजरे केले जातात, असे सांगतांना देवस्थानचे अध्यक्ष जयराम डांगे म्हणाले, यापूर्वीसुध्दा आमचे पुर्वज पुजेकरीता घरगुती गणपतीची स्थापना करीत होते. यावर्षी मात्र पोलिस प्रशासनाने शांतता समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला आणि क्षणाचाही विलंब न करता सर्वांनी होकार दिला. त्यानुसार सार्वजनिकरित्या येथे गणेशाची मुर्ती स्थापन करण्यात आली आहे. सकाळी आणि संध्याकाळी देान्ही वेळेस गणपतीची आरती झाल्यानंतर लगेच सवारीची पुजा करण्यात येते. 20 सप्टेंबरला मोहरम आणि गणेशोत्सवाची सांगता केल्यानंतर 22 सप्टेंबरला देवस्थानच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण उपक्रमात समाजातील सर्व धर्मीय बांधवांचे, नागरिकांचे आणि पोलिस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
धार्मिक बाबतीत संवेदनशील असलेल्या उमरखेडमध्ये विडूळ वासियांनी सर्वधर्म समभाव व सामाजिक ऐक्याचा आदर्श समाजापुढे ठेवला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
००००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी