बँकांनी महिला बचत गटांचे खाते त्वरीत उघडावे


आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी दिले निर्देश
      यवतमाळ, दि. 24 : देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 50 टक्के लोकसंख्या ही महिलांची आहे. आज महिला प्रत्येकच बाबतीत सक्षम होत आहे. बचत गटाच्या माध्यमातून तर महिलांची मोठी शक्ती उदयास आली आहे. या माध्यमातून त्या अर्थकारणसुध्दा सांभाळत आहे. केंद्र व राज्य सरकार महिला बचत गटांसाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करीत असतात. त्यामुळे बचत गटांचे बँकेत बचत खाते असणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखांनी आपापल्या क्षेत्रातील महिला बचत गटांचे खाते बँकेत उघडण्यासाठी सहकार्य करावे, असे निर्देश पालकमंत्री मदन येरावार यांनी आढावा बैठकीत दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत आदी उपस्थित होते.
            महिला सक्षमीकरण हे पहिले ध्येय आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, बँकेकडून महिला बचत गटांना मिळणा-या कर्जापैकी 99.09 टक्के कर्जाची रक्कम बँकेत भरली जाते. बचत आणि महिला हे बहुतांशी समानार्थी शब्द झाले आहेत. एक-एक पै न पै वाचवून महिला घराचे अर्थकारण सांभाळत असतात. आता बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण सक्षीमकरणात महिलांचे योगदान मोठे आहे. शासनाकडूनही त्यांच्या व्यवसायाला उभारी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करण्यात येते. त्यासाठी बँकेत बचत गटाचे खाते आवश्यक आहे. त्यामुळे उमेदच्या माध्यमातून बचत गटांना खाते उघडण्यासाठी बँकानी सहकार्य करावे. तशा सुचना जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी सर्व बँकाना त्वरीत द्याव्या, असे पालकमंत्री म्हणाले.
            अद्यापही जिल्ह्यात उमेदच्या 2 हजार 623 महिला बचत गटाचे बँक खाते उघडण्यात आले नाही. यात आर्णि तालुक्यातील 181 बचत गट, महागाव तालुका 284 बचत गट, उमरखेड तालुक्यातील 504 बचत गट, पुसद तालुका 422, दिग्रस तालुका 179, दारव्हा तालुका 289, नेर तालुका 195, यवतमाळ तालुका 335, मारेगाव तालुका 111 आणि वणी तालुक्यातील 123 बचत गटांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी यांनी दिली.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी