18 वर्षांवरील सर्व मतदारांची नावे यादीत समाविष्ठ करा - विभागीय आयुक्त पियुष सिंह



v जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक
      यवतमाळ, दि. 28 : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक बघता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. मतदार याद्यांमध्ये बदल, सुचना, नवमतदारांची नोंदणी आदी बदल करण्याचे काम प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. यात काही बदल करावयाचा असल्यास तो आता करणे गरजेचे आहे. मतदानाच्या वेळी गोंधळ होऊ नये म्हणून नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे. तसेच 18 वर्षांवरील जिल्ह्यातील सर्व मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ठ करावी, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सहायक जिल्हाधिकारी भुवनेश्वरी, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, स्वप्नील तांगडे, संदीप अपार, नितीन हिंगोले, स्वप्नील कापडनीस आदी उपस्थित होते.
1 जानेवारी 2019 या दिनांकाला वयाची 18 वर्षे पूर्ण करणा-या तरुण – तरुणींना मतदार करणे आवश्यक आहे, असे सांगून विभागीय आयुक्त पियुष सिंह म्हणाले, मतदार पुनरिक्षणाचे वेळापत्रक तसेच जिल्ह्यातील नवीन मतदार केंद्राची यादी राजकीय पक्षांना उपलब्ध करून द्यावी. बुथ लेव्हल एजंटकरीता राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मतदानासाठी पात्र असणारा कोणताही मतदार सुटू नये, याची काळजी घ्यावी. नवमतदार नोंदणीकरीता जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक बोलवावी. यात त्यांच्या महाविद्यालयातील 18 वर्षे पूर्ण करणा-या सर्व विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंदणी करावी. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीसुध्दा युवा मतदारांच्या नोंदणीसाठी पक्षाच्या युवा संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करावे. आदिवासी भागातील मतदारांपर्यंत पोहचून त्यांची नावे यादीत समाविष्ठ करून घ्या. दिव्यांग, महिला मतदारांच्या नोंदणीकडे गांभिर्याने लक्ष द्या, अशा सुचना विभागीय आयुक्तांनी केल्या. तसेच राजकीय पक्षांना काही सुचना करावयाच्या असल्यास त्यांनी बैठकीची वाट पाहू नये. तालुका किंवा जिल्हास्तरावरील प्रशासनाशी याबाबत त्वरीत संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.
बैठकीला भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी म्हणून मनिष गंजीवाले, संजय धात्रक, शिवसेनेचे पराग पिंगळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉ. सचिन येरमे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देवा शिवरामवार उपस्थित होते.
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी