ग्राम प्रवर्तकांनी शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवाव्या - पालकमंत्री मदन येरावार


यवतमाळ दि.06 : केंद्र आणि राज्य शासनाने नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून प्रत्येक योजना गावागावात पोहचणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्यमंत्री ग्रामप्रवर्तक निवडण्यात आले आहेत. या ग्राम प्रवर्तकांनी शासनाच्या सर्व योजना समजावून घेऊन त्या गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या बचत भवन येथे आयोजित ग्रामपरिवर्तकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी, गटविकास अधिकारी श्री. राठोड आदी उपस्थित होते.
सामाजिक परिवर्तन अभियानात निवडलेल्या गावांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा समावेश करण्यात येईल, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, या गावांचे कृती आराखडे तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. या अभियानात समाविष्ठ गावे मॉडेल म्हणून विकसीत करण्यात येईल. मुख्यमंत्री पॅकेजअंतर्गत विविध प्रकारच्या योजनांचा यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व योजना या गावात पोहचविण्याचा शासनाचा मानस आहे.
मुख्यमंत्री दत्तक गावात एकही नागरिक बेघर राहणार नाही. या योजनेत सुरवातीला 11 गावे होती आता यात वाढ करण्यात आली आहे. गावविकासाच्या महत्वाच्या योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे आहे. शबरी घरकुल योजनेत  कोलाम समाजासाठी 261 घरकुल तर रमाई घरकुल योजनेत दोन हजार ते 2250 घरे मंजूर करण्यात आाली आहे. ज्या गावात ग्रामपंचायत भवन नव्हते तेथे जिल्हा नियोजन समितीतून ग्रामपंचायत भवनासाठी निधी देण्यात आला आहे.  येणा-या काळात सर्व बचत गटांची व बँक व्यवस्थापकांची बैठक घेण्यात येईल. राज्यातील प्रत्येक महिला बचत गटाची सदस्या राहिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, कृषीसेवक, ग्रामविकास परिवर्तक, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, पोलिस पाटील, बचत गटाच्या महिला, नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी