इंडिया पोस्ट पेमेंट बँक सेवादृष्टीने कार्यरत - पालकमंत्री मदन येरावार




v बँकेतर्फे पोस्टाच्या ग्राहकांना क्यूआर कार्डचे वाटप
यवतमाळ, दि. 1 : देशात मोठ्या प्रमाणात बँकांचे जाळे विस्तारले असले तरी पोस्ट ऑफिसचे नेटवर्क आजही गावागावात आहे. पोस्टाच्या माध्यमातून जनतेपर्यंत बँकेच्या सुविधा पोहचविण्यासाठी केंद्र सरकारने इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) हे एक महत्वाचे पाऊल टाकले आहे. आजही पोस्टाची विश्वासहर्ता कायम आहे. त्यामुळे पोस्टाच्या वतीने सुरू करण्यात आलेली इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही नागरिकांसाठी सेवादृष्टीने कार्यरत राहील, असा विश्वास पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला.
टिंबर भवन येथे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे लोकार्पण करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर पोस्टाचे अधिक्षक ए.जे.सरकार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक जयंत घोडखांदे उपस्थित होते.
संपूर्ण देशात एकाच वेळेस आज आयपीपीबी चे लोकार्पण होत आहे, ही नागरिकांसाठी अत्यंत सुखदायी बाब आहे, असे सांगून असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, बँका ह्या व्यावसायिक असतात. मात्र पोस्टाची बँक ही सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे. 18 ते 20 वर्षांपूर्वी पोस्ट ऑफिस, तारघर, लॅन्डलाईन टेलिफोन यांचे एक वेगळे महत्व होते. शेवटच्या माणसांपर्यंत या सेवा होत्या. आपल्या शालेय जीवनात आपण पोस्टाच्या मनीऑर्डरची वाट बघत होतो. पोस्टमन हा गावात सर्वात लोकप्रिय असायचा. नागरिक त्याची आतुरतेने वाट  बघायचे. कालांतराने काळ बदलला. तळहातावर मोबाईल आल्यामुळे तारघर, पोस्ट ऑफिस, घड्याळ, कॅमेरे आदींचे महत्व कमी झाले. तरीसुध्दा पोस्टाने गावागावात विणलेले सौहार्दाचे संबंध कायम आहे. अशा सेवेचे बँकेमध्ये रुपांतर होणे ही अभिनंदनीय बाब आहे. या माध्यमातून नागरिकांना निश्चितच चांगली सेवा दिली जाईल. त्यामुळे पंतप्रधानांच्या स्वप्नातील देश घडेल, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.
या बँकेच्या माध्यमातून बचत खाते, चालू खाते, पैसे पाठविणे, हस्तांतरीत करणे, सरकारद्वारे अनुदानित योजनांचा लाभ, सर्व प्रकारची बिले भरणे आदी सेवा मिळणार आहेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. काऊंटर सेवेसह, एटीएम, एसएमएस आणि आयव्हीआर सेवा ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.
शहरात पानठेला चालविणारे रफिक खाँ फारुख पठाण, नारायण खुरड, कपडा व्यापारी पंकज गावंडे आणि व्यावसायिक प्रफुल मानकर या पोस्टाच्या ग्राहकांना पालकमंत्र्यांच्या हस्ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे क्यूआर कार्डचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोस्टाचे अधिक्षक ए.जे.सरकार यांनी तर संचालन सुनील रोहनकर यांनी केले. यावेळी पोस्टाचे सचिन घोरदडे, प्रशांत टोणे, विवेक मुंडेकर, नीलेश गावंडे यांच्यासह पोस्टाचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी