प्रसिध्द झालेल्या मतदार याद्या प्रत्येकाने बघाव्या - एसडीएम अपार




* मतदान केंद्र 241 चापर्डा येथे चावडी वाचन
यवतमाळ दि.11 : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता जिल्ह्यात मतदार याद्या पुन:रिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात 1 सप्टेंबर रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. या याद्या त्रृटीरहित करण्यासाठी तसेच आपले नाव यादीत समाविष्ठ आले की नाही, याची खात्री करण्यासाठी प्रसिध्द झालेल्या याद्या प्रत्येकाने बघाव्या, असे आवाहन उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी केले.
कळंब तालुक्यातील चापर्डा (मतदान केंद्र 241) येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत आयोजित मतदार याद्यांच्या चावडी वाचन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कळंबचे तहसीलदार सुनील पाटील, नायब तहसीलदार वंदना वासनिक, चापर्डाच्या सरपंचा सरला खंडाते, ग्रामपंचायत सदस्य सुरेश उईके, मंडळ अधिकारी विजय शिवणकर, मतदार नोंदणी अधिकारी (बीएलओ) हेमलता आत्राम आदी उपस्थित होते.
मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे, असे सांगून उपविभागीय अधिकारी संदीप अपार म्हणाले, गावागावात मतदार याद्यांच्या चावडी वाचनातून संबंधित व्यक्ती गावात राहतो की नाही, एखादे संपूर्ण कुटुंब इतर ठिकाणी स्थलांतरीत तर झाले नाही, मृतक व्यक्तिचे नाव यादीत समाविष्ठ आहे, यासारख्या अनेक गोष्टींची खात्री करता येते. मतदान करतेवेळी आपले नाव यादीत नसले की अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याशिवाय मतदानापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे या अडचणी टाळण्यासाठी व प्रारुप यादीतील त्रृटी दूर करण्यासाठी चावडी वाचनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या चावडी वाचनातून यादीतील त्रृटी निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मतदार नोंदणी अधिकारी हेमलता आत्रात यांनी याद्यांचे वाचन केले.
जिल्ह्यात मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रमांतर्गत 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाली आहे. यासंदर्भात दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत आहे. 30 नोव्हेंबर 2018 पुर्वी दावे व हरकती निकालात काढणे, 3 जानेवारी 2019 पूर्वी डाटाबेसचे अद्ययावतीकरण आणि पुरवणी यादीची छपाई तर 4 जानेवारी 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. 1 जानेवारी 2019 रोजी ज्या भारतीय नागरिकाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नाही म्हणजेच ज्यांची जन्मतारीख 1 जानेवारी 2001 वा त्यापुर्वीची आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहील.
1 सप्टेंबर 2018 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द केल्यानंतर ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ठ केली गेलेली नाही अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदणीबाबत आक्षेप घ्यावयाचे असतील किंवा त्यामध्ये दुरुस्ती/ सुधारणा करावयाच्या असल्यास अशा मतदारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. हे अर्ज 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात स्वीकारण्यात येतील.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी