रस्ते आणि पूल हे नागरिकांच्या विकासाचे प्रारंभबिंदू - पालकमंत्री मदन येरावार




v शहरातील वळण रस्ता व इतर रस्त्यांच्या सुधारणा कामाचे भुमिपूजन
यवतमाळ, दि. 1 : गाव, जिल्हा, राज्य आणि देश यांची प्रगती तेथील दळणवळणाच्या सोयींवर अवलंबून असते. दळणवळणाच्या सोयीसुविधा आणि मजबूत उड्डाण पूल आदींमुळे त्या-त्या भागात उद्योगांची आवक वाढते. पर्यायाने यातून नागरिकांना रोजगार, व्यवसायाची उपलब्धता आणि नागरिकांचा आर्थिक व सामाजिक विकास घडून येतो. त्यामुळे रस्ते आणि पूल हे नागरिकांच्या विकासाचे प्रारंभबिंदू आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
हायब्रिड ॲन्युटीअंतर्गत शहरातील वळण रस्ता व इतर रस्त्यांच्या सुधारणा कामाचे लोहारा बायपास रस्त्यावरील राजस्थान लॉन येथे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, न.प.बांधकाम सभापती प्रवीण प्रजापती, शिक्षण सभापती निता केळापूरे आदी उपस्थित होते.
रस्ते हे विकासाच्या रक्तवाहिन्या आहेत, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, विदर्भ आणि मराठवाड्यात हॉयब्रिड ॲन्युटी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत विदर्भात सर्वात प्रथम भुमिपूजन यवतमाळ येथील रस्त्यांच्या कामाचे होत आहे. 200 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणा-या या रस्त्यांच्या कामाची कालमर्यादा दोन वर्षांची आहे. मात्र निर्धारीत कालावधीपेक्षा एक ते दीड वर्षात हे काम पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी हे रस्ते उपलब्ध होतील. जिल्ह्यात दोन राष्ट्रीय महामार्ग, समृध्दी महामार्ग आणि रेल्वेचे जाळे उभारले जात आहे. त्यामुळे येथील कच्च्या मालाची वाहतूक आणि इतर उद्योग येथे येण्यास मदत होईल. युती सरकारच्या काळात 1997 मध्ये बनविलेला बसस्थानक ते कळंब चौक सिमेंटचा रस्ता आजही 2018 मध्ये सुस्थितीत आहे. या रस्त्याला नवीन तंत्रज्ञानाने आणखी चांगला करण्यासाठी 50 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.
राज्यात सरकारने 10 हजार किमीच्या रस्त्यांसाठी 32 हजार कोटींचे पॅकेज हॉयब्रिड ॲन्युटी अंतर्गत आणले आहे. यात शासनाचा वाटा 60 टक्के तर कंत्राटदाराचा वाटा 40 टक्के आहे. सद्यस्थितीत यवतमाळ मध्ये 1 हजार 300 कोटींचे पायाभुत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत. या रस्त्यांच्या कामाचे पैसे संबंधित कंत्राटदाराला पुढील दहा वर्षात मिळणार आहे. दहा वर्षे देखभालदुरुस्ती आणि गुणवत्ता नियंत्रण लॅब बांधणे यांचा यात समावेश करण्यात आला आहे. हे रस्ते चांगल्या दर्जाचे करण्यात येतील, असा विश्वास आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
यवतमाळ शहराबाहेरील 13.46 किमीच्या वळण रस्त्याची सुधारणा करणे (कळंब चौफुली पिंपळगाव ते लोहारा) तसेच बाभुळगाव व कळंब या तालुका मुख्यालयांना जोडणा-या 34.23 किमीच्या रस्त्यांची सुधारणा या कामांचा यात समावेश करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता योगेश लाखानी यांनी तर संचालन व आभार मनोज उमरतकर यांनी केले. यावेळी नगरसेवक सुजित रॉय, करूणा तेलंग, अमोल देशमुख, लता ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते. 
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी