स्पर्धा परिक्षेसाठी स्वत:चा आत्मविश्वास वाढवा - एसडीएम स्वप्नील तांगडे




v लोकराज्य वाचक अभियान व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
v जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
यवतमाळ, दि. 1 : प्रशासनामध्ये मोठमोठ्या पदांसाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जागा भरल्या जातात. सुरवातीच्या काळातील परीक्षा आणि आजच्या काळातील या परिक्षांमध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. या परिक्षांमध्ये यश संपादन करायचे असेल तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी स्वत:चा आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी केले.
शासकीय जिल्हा ग्रंथालयात जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित लोकराज्य वाचक अभियान व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनाने, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेबाबत गांभिर्य ठेवावे, असे सांगून उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे म्हणाले, स्पर्धा परिक्षेबाबत सर्व गोष्टी आज विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. तरीसुध्दा बहुतांश विद्यार्थी साधा संबंधित परीक्षेचा अभ्यासक्रमसुध्दा वाचत नाही. अनेकजण केवळ विरंगुळा म्हणून अभ्यास करतात. विद्यापीठांच्या परिक्षेचा अभ्यासक्रम व पध्दत स्पर्धा परिक्षेच्या पध्दतीपेक्षा संपूर्ण वेगळी आहे. ज्या जागांसाठी अर्ज करायचा त्याचा अभ्यासक्रम सुरवातीला वाचणे गरजेचे आहे. तसेच मोठ्या पदांच्या जागांसाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे. विशेष म्हणजे त्यासाठी मानसिकरित्या सक्षम असणे आवश्यक आहे.
स्वत:ला काय बनायचे ते आधी ठरवा. महाराष्ट्र शासनाचे लोकराज्य आणि महाराष्ट्र वार्षिकी ही स्पर्धा परिक्षेसाठी अत्यंत उपयुक्त  पुस्तके आहेत. ते नियमित वाचावे. याशिवाय शालेय अभ्यासक्रमातील पुस्तके वाचणे आजही आवश्यक आहे. स्पर्धेत टिकायचे असेल तर चांगली व मोठी पुस्तके वाचा. तसेच सर्व जागांसाठी अर्ज करावा. इतर लोक आपला आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे विनाकारण मनात भीती ठेवू नका. मनातील भीतीमुळे जास्त चुका होतात, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी लोकराज्य मासिकाचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी तर आभार जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने यांनी मानले. कार्यक्रमाला कार्यालयातील सचिन गजभिये, गजानन डहाके, जयप्रकाश बानाईत, नरेंद्र गावंडे, ग्रंथालयाचे गुल्हाणे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी