80 टक्के अनुदानावर मागेल त्याला ठिबक सिंचन – कृषी मंत्री डॉ. बोंडे







v बाभुळगाव येथे शेतकरी प्रशिक्षण व कृषी मेळावा
यवतमाळ दि. 7 : आपल्या भागातील जमीन ही मुख्यत: कोरडवाहू आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून महत्वाकांक्षी ठरलेली मागेल त्याला शेततळे ही योजना प्रचंड यशस्वी झाली. याच धर्तीवर आता मागेल त्याला ठिबक सिंचन योजना राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले.
बाभुळगाव येथील साई मंगल कार्यालयात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा) आयोजित शेतकरी प्रशिक्षण व कृषी मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, विभागीय सहसंचालक सुभाष नागरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे किटकशास्त्रज्ञ डॉ. उंदीरवाडे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगिरवार, कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, नितीन भुतडा, बाभुळगाव नगर पंचायतचे अध्यक्ष प्रवीण गौरकर आदी उपस्थित होते.
शेतक-यांमध्ये किटकनाशक फवारणी, बोंडअळी व्यवस्थापन आणि कृषी विभागाच्या योजनांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे म्हणाले, डॉ. अशोक उईके यांच्यासारखे कर्तव्यदक्ष मंत्री आदिवासी विकास विभागाला लाभले आहे. त्यांच्या पुढाकारातूनच हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती आहे त्याचा लाभ घ्यावा. सुरवातीच्या काळात सर्वकाही पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला येत होते. आता मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भावर फोकस केला. बेंबळामधून पाणी शेतकऱ्यांच्या शेतात गेले पाहिजे. सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने बळीराजा जलसंजीवनी योजना आणली आहे.
यवतमाळमध्ये शेतक-यांना सोलर पंप देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी मागेल त्याला शेततळे योजना यशस्वी करून दाखविली. जलयुक्त शिवारमुळे नाला खोलीकरण झाले. त्यामुळे 1 किमी परिसरातील विहीरींची पाणी पातळी वाढण्यास मदत होते. ठिंबक सिंचनाचे अनुदान सर्वांना देण्याचा मानस आहे. मागेल त्याला शेततळ्याच्या धर्तीवर 80 टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येईल. यासाठी शेतक-यांनी कृषी सहाय्यकाकडे संपर्क करावा. गटशेती ही काळाची गरज आहे. डॉक्टर लोक एकत्र येऊन प्रॅक्टीस करतात. हाच कित्ता शेतक-यांनीसुध्दा राबवावा. शेतकऱ्यांनीही एकत्र येवून 100 एकराचा 25 शेतकऱ्यांचा गट तयार करा. या गटाला 60 टक्के अनुदानावर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत ट्रॅक्टर अनुदान मिळते.
सोबतच शेतकरी उत्पादक गट बनविला तर कोल्डस्टोरेज, फळबाग आदींसाठी अनुदानाची सोय आहे. पिक विमा योजनेसंदर्भात बोलतांना कृषी मंत्री म्हणाले, विमा कंपनीच्या एजंटला जिल्हास्तरावर कृषी अधिक्षक कार्यालयात तर तालुक्याच्या स्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बसायला सांगितले आहे. त्यामुळे नुकसान झाले तर त्वरीत एजंटशी संपर्क करा. शेतकऱ्यांचे जीवन अनमोल आहे. त्यामुळे किटकनाशकांची फवारणी करतांना संरक्षक किट वापरणे गरजेचे आहे. व्यसन करून फवारणी करू नका. कृषी विभागामार्फत बोंडअळी नियंत्रणासाठी, फवारणी जनजागृतीबाबत चांगले काम होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी नेण्याचे नियोजन असून अडीच एकराच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न अडीच लक्ष करण्यावर शासनाचा भर आहे. पुर्वीच्या आणि आताच्या कर्जमाफीत मोठा फरक आहे. या सरकारच्या काळात पात्र आणि योग्य शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असून 30 जुन 2016 पुर्वीचे काढलेले कर्ज 100 टक्के माफ होणार आहे, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.


शासन शेतक-यांपर्यंत पोहचत आहे – आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके
          किटकनाशक फवारणी आणि बोंडअळी व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा मानस होता. राज्याचे कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांचा शेतीविषयक अभ्यास पाहूनच त्यांची या पदावर वर्णी लागली आहे. कृषी विषयावर त्यांनी मला वारंवार मार्गदर्शन केले असून शेतक-यांशी संवाद साधण्यासाठी ते बाभुळगावात आले आहेत. शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात शासन शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.
          जलसंधारणाच्या महत्वाचे काम जिल्ह्यात झाले आहे. शेततळ्यांमध्ये जिल्हा अव्वल आहे. शेतक-यांपर्यंत योजना पोहचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, विविध कंपन्या आणि बळीराजा चेतना अभियानकडून शेतकऱ्यांना संरक्षक किटचे वाटप करण्यात आले असून शेतक-यांनी फवारणी करतांना या संरक्षक किटचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सह्याद्री सन्मान पुरस्कारप्राप्त वच्छलाबाई गर्जे यांच्यासह स्वप्नील पाटील, आशिष दिघाडे, साहिल घोडे, गौतम भोंगाडे कृणाल दरणे आदींना पूर्वसंमती प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न नानाजी देशमुख, डॉ. पंजाबराव देशमुख, वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. तसेच मान्यवरांनी परिसरात लागलेल्या स्टॉलला भेट दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी गावंडे यांनी तर संचालन कैलास राऊत यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. प्रमोद मगर, सतीश मानलवार यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी