किटकनाशक फवारणीकरीता संरक्षक किट वापरणे सक्तीचे करा - पालकमंत्री मदन येरावार






v फवारणी यंत्राचे उद्घाटन व जनजागृती रथाला हिरवी झेंडी
यवतमाळ दि. 3 : दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात किटकनाशक फवारणीमुळे शेतकरी आणि शेतमजुरांना आपले प्राण गमवावे लागले होते. या हंगामात आजघडीला 33 रुग्ण फवारणीबाधित झाले आहेत. यापैकी 30 जणांनी संरक्षक किटचा वापर न केल्यामुळे त्यांना फवारणीतून विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे किटकनाशक फवारणी करतांना संरक्षक किट वापरणे सक्तीचे करावे. त्यासाठी संपूर्ण यंत्रणेने गांभिर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात किटकनाशक फवारणी संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार, कृषी विज्ञान केंद्राचे संशोधन शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगिरवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात भुतकाळाची पुनरावृत्ती होऊ देऊ नका, असे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, ग्रामीण स्तरावर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात ॲन्टीडोज तयार ठेवा. येणा-या काळात वातावरणात आद्रता वाढली तर फवारणी करणे आणखी कठीण होणार आहे. त्यामुळे या सर्व बाबी शेतक-यांना समजावून सांगा. संरक्षक किटचे महत्व फवारणी करणा-या टिमला सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह ग्रामस्तरावरील पटवारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, तहसीलदार, गटविकास अधिकारी आदींनी जनजागृती करावी.
किटकनाशक फवारणीसंदर्भात ग्रामीण स्तरावर प्रत्येक ठिकाणी प्रात्यक्षिके घ्या. तसेच फवारणी करणा-यांना ओळखपत्र देण्याचे नियोजन करा. फवारणी करणा-यानेसुध्दा दिवसातून किती फवारायचे आहे, ते ठरवून घ्यावे. सध्यास्थितीत फवारणी करणारे दिवसभरात 30 ते 40 पंप फवारणी करतात. हे धोकादायक आहे. फवारणी करणा-या लोकांचे आरोग्य शिबिर आयोजित करून त्यांना प्रमाणपत्र द्यावे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालये अद्ययावत सोयीसुविधांनी उपयुक्त ठेवावे, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, फवारणी संदर्भात प्रशासनाकडून आवश्यक त्या सुचना देण्यात आल्या आहेत. सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून सिंजेंटा इंडिया कंपनीतर्फे 1 जूनपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमुसह नागपूर येथील व्होकहार्ट हॉस्पिटलची मोबाईल व्हॅन गावागावात जावून रुग्ण तपासणी करीत आहे. आतापर्यंत 97 गावांमध्ये रुग्ण तपासणी तसेच विषबाधेकरीता आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय कोची येथील अम्रीता चिकित्सा अनुशंधान संस्थेतील विषबाधा नियंत्रण केंद्राचे प्रमुख डॉ. व्ही.व्ही. पिल्लई यांनी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील विषबाधित रुग्णांवर उपचार करणा-या 200 वैद्यकीय अधिकारी / डॉक्टर/ चिकित्सकांचे प्रशिक्षण घेतले आहे, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
यावेळी कृषी विभाग व युपीएल कंपनीद्वारे फवारणी करणा-या यंत्राचे पालकमंत्री यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यात असे 17 यंत्र देण्यात आले असून या यंत्राद्वारे एक ते सात फुटापर्यंत सुरक्षित फवारणी करण्यात येते. एका दिवसात 40 एकर फवारणी करणे शक्य आहे. या यंत्राचा फवारणीचा दर 120 रुपये प्रति एकर आहे. ******

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी