बचत हा महिलांचा स्थायीभाव - पालकमंत्री येरावार




v महिला बचत गट, मुद्रा योजना व वॉटरकप स्पर्धेचा पुरस्कार सोहळा
यवतमाळ दि. 4 : आजच्या महिला ह्या ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेतून बाहेर पडल्या आहेत.  नव्हे तर त्या पुरुषांच्या एक पाऊल पुढेच आहे. कुटुंबाचा विचार केला तर घरचे सर्व आर्थिक नियोजन महिलाच करीत असतात. यात मुलांचे शिक्षण, रोजचा खर्च, सण-उत्सवात घरगुती खर्च आदींचा समावेश आहे. कधीकधी तर पदरमोड करून त्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करीत असतात. एकप्रकारे बचत हा महिलांचा स्थायीभाव बनला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नियोजन विभाग, जिल्हा अग्रणी बँक आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने दादासाहेब कोल्हे सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. महिला बचत गट, हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील विजेते तसेच मुद्रा बँक योजनेतील लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मंचावर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजन वानखेडे, कृषी विज्ञान केंद्राचे संशोधन अधिकारी डॉ. प्रमोद यादगिरवार आदी उपस्थित होते.  
एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के लोकसंख्या असलेल्या महिलांचे देशाच्या वाटचालीत महत्वाचे योगदान आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोनती अभियानच्या (उमेद) महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. बचत गटाचे खेळते भांडवल 100 टक्के वाढविण्यात येईल. महिला बचत गटातील सदस्यांशी संवाद साधण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द पांढरकवडा येथे आले होते, असे त्यांनी सांगितले.
नाविन्यपूर्ण योजनांसाठी सरकारचे प्राधान्य आहे. शेळीपालन, परसबाग, वेगवेगळे प्रक्रिया उद्योग, कृषी अवजारे आदींसाठी 2.73 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सध्या मार्केटिंग, ब्रँडींग आणि पॅकेजिंगचे युग आहे. त्यामुळे याबाबत महिलांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. महिला बचत गटाच्या उत्पादनांच्या विक्रीकरीता शहरात भव्य इमारत बांधण्यात आली आहे. ही इमारत पूर्णत्वास आली असून कदाचित पुढील बैठक किंवा मेळावा या इमारतीच्या सभागृहात होईल, अशी आशा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना सुरू करण्यात आली आहे. विना तारण कर्ज या योजनेंतर्गत देण्यात येते. मुद्राचे कर्ज देण्याकरीता जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने बँका नागरिकांपर्यंत पोहचत आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. पाण्याच्या संवर्धनासाठी सरकारने मनरेगा, जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, धडक सिंचन कार्यक्रम हाती घेतले आहे. तसेच सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांना जलसंवर्धनाचे महत्व पटले आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची अंतर्गत जिल्हास्तरावर महिला बचत गटांची निवड झाली आहे. जिल्हास्तरावर दोन लक्ष रुपये तर तालुका स्तरावर 50 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. वॉटर कप स्पर्धेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट काम केले त्या सर्व गावक-यांचे अभिनंदन करून जिल्हाधिकारी म्हणाले, यामुळे जलसंवर्धनाची चळवळ अधिक वृध्दींगत होईल. मुद्रा बँक योजनेंतर्गत गरजू आणि पात्र इच्छुकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते जागृती स्वयंसहायता महिला बचत गट (धानोरा, ता. झरीजामणी), अनुसया स्वयंसहायता महिला बचत गट (टेंभी, ता. झरीजामणी), जयमहालक्ष्मी स्वयंसहायता महिला बचत गट (ता. दारव्हा), कळंब येथील दामिनी महिला बचत गट, नेर येथील समृध्दी महिला बचत गट, राळेगाव येथील उन्नती महिला बचत गट, पांढरकवडा येथील श्रध्दा स्वयंसहायता महिला बचत गट, महागाव येथील गोरोबा महिला बचत गट, वणी येथील शारदा आणि घाटंजी येथील आदिशक्ती महिला बचत गटाला प्रत्येकी दोन लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रंजन वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी