परिवहन महामंडळाची ‘बस’ ही खरी लोकवाहिनी – राज्यमंत्री संजय राठोड




Ø नेर, दारव्हा, दिग्रस येथील बसस्थानकाच्या आधुनिकीकरण कामांचा शुभारंभ
यवतमाळ दि. 11 : राज्य परिवहन महामंडळाची बस ही सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महिला, पुरुष, युवक-यवुती, विद्यार्थी आणि सर्वच नागरिकांनी बसमधून प्रवास केला आहे. ग्रामीण भागात वाहतुकीचे मुख्य साधन ही बस असल्यामुळे ती ख-या अर्थाने लोकवाहिनी आहे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.
नेर आगार बसस्थानकाच्या आधुनिकीकरण व दर्जावाढ कामाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी नेरच्या नगराध्यक्षा सुनिता जयस्वाल, पवन जयस्वाल, पंचायत समिती सभापती मनिषा गोडे, महामंडळाचे विभागीय नियंत्रण श्रीनिवास जोशी, अमरावती येथील महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्या शीतल गोंड, एस.एम. राजगुरे, पराग पिंगळे, बाजार समितीचे अध्यक्ष रविंद्र राऊत, नेर आगारप्रमुख दिप्ती वड्डे आदी उपस्थित होते.
या बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचे व दर्जावाढीचे तीन टप्प्यात काम होणार आहे, असे सांगून महसूल राज्यमंत्री संजय राठोड म्हणाले, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, नेर, दारव्हा, दिग्रस येथील बसस्थानकाच्या नुतणीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून आहे, ही जिल्ह्यासाठी आनंदाची बाब आहे. एस.टी. हा जिव्हाळ्याचा विषय असून ग्रामीण भागातील जनतेला वाहतुकीसाठी एस.टी.वरच अवलंबून राहावे लागते. एस.टी.वर नागरिकांचा विश्वास असून एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. परिवहन मंत्र्यांनी या खात्यात विविध सुधारणा केल्या असून एस.टी. मध्येसुध्दा आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांचा वेतनाचा प्रश्नसुध्दा त्यांनी मार्गी लावला आहे.
आदिवासी मुलींच्या हाती सर्वात प्रथम यवतमाळ जिल्ह्यात स्टेअरिंग उपलब्ध होणे, ही जिल्ह्यासाठी भुषणावह बाब आहे. याबाबत राज्यात आता धोरण ठरले असून यवतमाळ जिल्ह्यातील 22 आदिवासी मुलींना चालकपदी नियुक्ती मिळाली आहे. लवकरच नवीन एक हजार एस.टी. ची निर्मिती होणार असून यापैकी 50 टक्के बसेस विदर्भाला मिळतील. यात स्वाभाविकच मग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नवीन बसेस उपलब्ध होणार आहे. यानंतरही प्रवाश्यांना चांगल्या सुविधा देण्यात येईल, असे राज्यमंत्री राठोड यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी नेरसोबतच दारव्हा आणि दिग्रस येथील बसस्थानकांच्या कामांचेसुध्दा भुमिपूजन केले. नेर बसस्थानकाच्या आधुनिकीकरण व दर्जावाढ करण्याच्या कामामध्ये सद्यास्थितीतील इमारतीची विशेष दुरस्ती व रंगरंगांटीचे काम अंतर्भुत आहे. त्यामध्ये प्रवाशी प्रतिक्षालयाच्या बैठक व्यवस्थेची विशेष दुरस्ती करून अद्यावत करण्याचे काम,फलाटची पातळी वर घेवून सुरक्षेच्या दृष्टिने विशेष दुरस्ती करण्याचे काम आणि महिला, लहान मुले व दिव्यांगव्यक्ती यांच्याकरीता विशेष सोईसुविधा उपलब्ध करण्याचे काम करण्यात येणार आहे. तसेच कर्मचारी व प्रवाशांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांकरीता अतिरिक्त वाहनतळ करून सुसज्ज पार्कींग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.पावसाच्या येणा-या पाण्याचा योग्य निचरा होण्याच्या दृष्टिने कॉक्रीट नालीचे बांधकाम करण्यात येणार आहे. सद्यास्थितीतील प्रसाधनगृहाची दुरूस्ती व रंगरंगोटी करून स्वच्छतेच्या दृष्टिने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कामासाठी अंदाजे 1 कोटी 23 लक्ष रुपये इतका खर्च येणार असून हे काम 10 महिने मुदतीत पुर्ण करण्यात येईल.
दारव्हा येथील बांधकामासाठी 3 कोटी 91 लक्ष खर्च होणार आहे. हे काम 12 महिन्याच्या मुदतीत पूर्ण करण्यात येईल. या कामाअंतर्गत दारव्हा येथील सध्याचे बसस्थानक संपुर्णपणे तोडून त्याजागी 13 फलाटांची सुसज्ज अशी दुमजली बसस्थानक इमारत उभारण्याचे काम करण्यात येईल. त्यामध्ये सात दुकाने, पुरूष व महिला प्रसाधनगृह, जेनरिक औषधालय, हिरकणी कक्ष, पार्सल कक्ष, पुरूष चालक/ वाहक विश्रांतीगृह, महिला चालक/वाहक विश्रांतीगृह, एटीएम कक्ष, आरक्षण कक्ष, चौकशी कक्ष इत्यादी बांधकाम करण्यात येणार आहे. दिव्यांगासाठी रॅम्पचे बांधकाम करण्यात येईल. तसेच संपुर्ण वाहनतळाचे कॉक्रीटीकरण करणे,नालासाईट कुंपनभिंतीच्या बाजुने वृक्षलागवड ईत्यादी कामे करून सुशोभिकरण करण्यात येत आहे.
दिग्रस येथील सध्याचे बसस्थानक संपुर्णपणे तोडुन त्याजागी ८ फलाटांची सर्व सोईनीयुक्त सुसज्ज अशी बसस्थानक इमारत उभारण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामध्ये सहा दुकाने, पुरूष व महिला प्रसाधनगृह, पार्सल कक्ष, पुरूष चालक/ वाहक विश्रांतीगृह,पोलीस तक्रार निवारण कक्ष, आरक्षण कक्ष, चौकशी कक्ष, इत्यादी बांधकाम करण्यात येणार आहे. दिव्यांगासाठी रॅम्पचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच संपुर्ण वाहनतळाचे कॉक्रीटीकरण, वृक्षलागवड ईत्यादी कामे करून सुशोभिकरण करण्यात येत आहे. या कामासाठी अंदाजे 2 कोटी 83 लक्ष रुपये खर्च येणार असून हे काम १० महिने मुदतीत पुर्ण करण्यात येईल.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी