प्रत्येक दिव्यांग मतदारांपर्यंत पोहचा – विभागीय आयुक्त






                                 
v विधानसभा निवडणुकीबाबत आढावा
v जिल्हाधिका-यांची दिव्यांगासाठी काम करणा-या संस्था व प्रतिनिधींशी बैठक
यवतमाळ दि , 30 : सर्वांसाठी ‘सुलभ निवडणुका’ हे निवडणूक विभागाचे घोषवाक्य आहे. या माध्यमातून दिव्यांग मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी सर्व मतदान केंद्रावर सुविधा पुरविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकही दिव्यांग मतदान मतदानापासून वंचित राहता कामा नये, यासाठी अधिकारी, कर्मचारी तसेच दिव्यांगांसाठी काम करणा-या संस्था व प्रतिनिधींनी या मतदारांपर्यंत पोहचावे, अशा सुचना विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केल्या.
नियोजन सभागृहात विधानसभा निवडणूक -2019 चा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक श्री. मनपिया आदी उपस्थित होते.
दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे सांगून विभागीय आयुक्त पियुष सिंह म्हणाले, मतदान केंद्रावर आवश्यकता असल्यास नेहमीसाठी रॅम्प तर ज्या ठिकाणी शक्य होत नसेल त्या ठिकाणी मजबूत पण तात्पूरत्या स्वरुपात रॅम्प निर्माण करा. या रॅम्पवरून संपूर्ण व्हीलचेअर मतदान केंद्रांच्या आत जाणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात रॅम्पच्या व्यवस्थेवर गटविकास अधिका-यांनी लक्ष ठेवावे. एका आठवड्यात याबाबत अहवाल सादर करा. दिव्यांग मतदारांसाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करा. ग्रामीण आणि शहरी भागात अशा स्वयंसेवकांची यादी निश्चित करा. प्रत्येक दिव्यांग मतदारांपर्यंत पोहचून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करा. तसेच दिव्यांग मतदारांसोबत सहकारी म्हणून कोण येणार आहेत, त्यांचीसुध्दा यादी तयार ठेवा.
दिव्यांग मतदारांची ने-आण व त्यांच्यासाठी लागणा-या सुविधांबाबत जिल्हास्तरावर तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय समिती तयार झाली असेल तर त्याचा अहवाल पाठवा. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मॉडेल मतदान केंद्र, महिलांद्वारे चालविण्यात येणारे मतदान केंद्र आणि दिव्यांग प्रतिनिधींमार्फत चालविण्यात येणारे मतदान केंद्र आदींचे नियोजन करावे, अशा सुचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.
जिल्ह्यात एकूण 5333 दिव्यांग मतदार असून यात ७६ - वणी विधानसभा मतदारसंघात 595 मतदार, 77 – राळेगाव विधानसभा मतदारसंघात 1016 मतदार, 78 – यवतमाळ विधानसभा मतदारसंघात 632 मतदार, 79 – दिग्रस विधानसभा मतदारसंघात 1531 मतदार, 80 – आर्णि विधानसभा मतदारसंघात 777 मतदार, 81  - पुसद विधानसभा मतदारसंघात 464 मतदार आणि 82 – उमरखेड विधानसभा मतदारसंघात 318 दिव्यांग मतदार आहेत.


जिल्हाधिका-यांनी घेतली दिव्यांगांसाठी कार्यरत संस्था व प्रतिनिधींची बैठक
          जिल्ह्यात दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या संस्था व प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बैठक घेतली. नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यात रॅप्म, व्हीलचेअर, त्यांची ने-आण करणे आदी सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दिव्यांगांनी मतदान करावे, यासाठी प्रयत्न करावा. दिव्यांग मतदारांनी यादीत नाव नसेल तर त्वरीत फॉर्म नंबर 6 भरून नोंदणी करावी. त्यासाठी दिव्यांगाकरीता कार्यरत असलेल्या संस्थांनी मदत करावी. तसेच मतदानाच्या दिवशी दिव्यांगांना ने-आण करण्यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी सहकार्य केल्यास प्रशासनातर्फे सुक्ष्म नियोजन करून दिव्यांग मतदारांपर्यंत पोहचता येईल. यासाठी ऑटो युनियन व टॅक्सी असोसिएशनचीसुध्दा मदत घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
          तर मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा म्हणाले, प्रत्येक दिव्यांगांनी मतदानाचा अधिकार बजवावा. गत निवडणुकीपेक्षा जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान करावे. तसेच दिव्यांगांसाठी स्वयंसेवकांनी आपले नाव व संपर्क क्रमांकाची यादी त्वरीत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
          बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, समाजकल्याण उपायुक्त किशोर भोयर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांच्यासह संस्थेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
   

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी