राज्य घटनेतील मुलभूत अधिकारांची अंमलबजावणी आवश्यक - न्यायमुर्ती रवि देशपांडे





                                       
v  कळंब येथे शासकीय योजनांचा महामेळावा
यवतमाळ दि. 8 : भारतीय राज्यघटनेत नागरिकांच्या मुलभूत अधिकारांचा समावेश आहे. समाजातील सर्व घटकातील नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती तथा नागपूर विधीसेवा उपसमितीचे अध्यक्ष न्या. रवी देशपांडे यांनी केले.
कळंब येथील मोरया मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमुर्ती तथा यवतमाळ जिल्ह्याचे न्यायिक पालक न्यायमुर्ती अतुल चांदूरकर तर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश  किशोर पेठकर, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या काळात चिंतामणीच्या नगरीत या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे, असे सांगून न्यायमुर्ती रवि देशपांडे म्हणाले, शासकीय सेवा व योजनांच्या मेळाव्यातून नागरिकांना पुरेपूर फायदा होईल. केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना असून तळागाळातील नागरिकांना या योजनांची माहिती होणे आवश्यक आहे. शासकीय योजना केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून नागरिकांची सामाजिक व आर्थिक प्रगती करणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच सर्वांच्या समन्वयातून एका छताखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी न्यायमुर्ती अतुल चांदुरकर म्हणाले, या महामेळाव्यात विविध शासकीय सेवांची व योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी उपस्थित नागरिकांनी येथे लावलेल्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन योजनांची माहिती घ्यावी. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माहिती पोहचण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, समाजातील महिला, विद्यार्थी, शेतकरी, आदिवासी, लहान बाळ, ज्येष्ठ नागरिक आदींसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. व्यवसाय, स्वयंरोजगार, गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनातर्फे सर्व प्रकारची मदत करण्यात येते. मात्र बहुतांश नागरिकांना योजनांची माहिती नसते. शासनाच्या योजनांची माहिती व्हावी, याकरीता येथे विविध विभागांनी आपले स्टॉल लावले आहेत. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा. आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास 23 हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. तर आजच्या मेळाव्यातून 6 हजारांच्यावर लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.


या लाभार्थ्यांना मिळाला लाभ
शेतक-याच्या बांधावर वृक्ष लागवड योजनेंतर्गत विकास गर्जे, मिनी ट्रॅक्टर योजनेंतर्गत सरपधरी येथील

सम्यक बचत गट आणि सावरगाव येथील सम्यक पुरुष बचत गट, कामगार विभागाच्या अवजारे खरेदी योजनेंतर्गत सलीम हमीद शेख, मुक्ती बंदी पुनर्वसन योजना सुधाकर भोयर, प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत राजेश काळे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत संदीप पवार, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत शशांक मेहता, दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत शंकर मेश्राम, दिव्यांगांना तीन चाकी सायकल वाटप योजनेंतर्गत दुर्गा मुखरे, मतिमंद पालकत्व घेणारे पालक हरीदास खंडाळकर, अंत्योदय योजनेंतर्गत पुरुषोत्तम वतारे, श्रावणबाळ योजनेंतर्गत पार्वताबाई तडसे, राष्ट्रीय कुटुंब योजनेंतर्गत देवजी वाघमारे, छाया फुलमाळी, सुलाबाई कोडापे, पंडीत दिनदयाल उपाध्याय उज्वला गॅस योजनेंतर्गत प्रिया पेंदोर, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामाचे गवंडी कामगारांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रदीप नंदपटेल, वन्यप्राण्यांमुळे झालेली मनुष्यहानी अंतर्गत नुकसान भरपाई गुलाब झोड, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना व जननी सुरक्षा योजनेंतर्गत मनिषा नगराळे, माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत शुभ्रा काळे यांना 25 हजार रुपयांची एफडी, आदिवासी मुलींना परिवहन मंडळात चालक पदाचे नियुक्ती अंतर्गत अंजुता भोसले, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत सुरक्षा किट रामेश्वर जाधव,  कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत रोटाव्हेटर बाजीराव शिंदे व ट्रॅक्टरचा लाभ श्रीकृष्ण अत्रे, शहिल घोडे, गौतम भोंगाडे, धडक सिंचन विहिर योजनेंतर्गत सुभाष आडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत विहिर नंदकिशोर गौरकार आणि क्रीडा नैपुण्य मिशन शौर्य अंतर्गत एव्हरेस्ट मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल सुषमा मोरे हिला आठ लक्ष रुपयांची एफडीचा लाभ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.


            यावेळी उमेदमार्फत 1.50 कोटींचे तर महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत 7.5 लक्ष रुपयांचे वाटप महिला बचत गटांना करण्यात आले.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते फित कापून प्रदर्शनीचे उद्घाटन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर यांनी केले. संचालन दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) योगिता मुक्कनवार आणि दहावे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) गायत्री निमदेव यांनी तर आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश एम.आर.ए.शेख यांनी मानले. कार्यक्रमाला न्यायाधीश, सर्व प्रशासकीय अधिकारी, न्यायीक अधिकारी, लाभार्थी आणि महिला बचत गटाच्या सदस्या, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी